शहरातील पर्यटनस्थळांचा विकास कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 10:44 PM2019-07-06T22:44:25+5:302019-07-06T22:44:57+5:30
गवळीदेवलाही समस्यांचा विळखा, अडवली-भुतावलीचा प्रस्तावही बारगळला
- नामदेव मोरे
नवी मुंबई : स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमधील पर्यटनस्थळांचा विकास रखडला आहे. गवळीदेव धबधबा परिसरालाही समस्यांचा विळखा पडला आहे. अडवली - भुतावली निसर्ग पर्यटनस्थळाचा प्रस्तावही बारगळला असून प्रशासनाच्या उदासीनतेविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून गवळीदेव धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणेसह रायगड जिल्ह्यामधील पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून गवळीदेवची ओळख आहे. पनवेलमधील कुंडी धबधब्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
अपघातामुळे पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. परंतु गवळीदेववर आतापर्यंत पर्यटकांचा मृत्यू झालेला नाही. यामुळे येथे सहकुटुंब पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पर्यटकांची संख्या वाढली, परंतु त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील दोन्ही ठिकाणच्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. त्याची साफसफाई करण्यासाठी काहीही सोय नाही. धबधबा परिसरामध्ये जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. रेलिंग बसविण्यात आले नाही. सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सर्वाधिक गर्दी या ठिकाणी होत असते. पण अद्याप त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला नाही. क वर्ग पर्यटनस्थळामध्ये याचा समावेश व्हावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करू लागले आहेत. दिघामधील रेल्वे धरण परिसरामध्येही निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार होते. धरण व बाजूच्या डोंगरावर पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे प्रस्तावित होेते. याविषयी घोषणा झाली प्रत्यक्ष काहीच कार्यवाही झालेली नाही.
महापालिकेने यापूर्वी अडवली - भुतावली परिसरामध्ये निसर्ग पर्यटनकेंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. ६४४ हेक्टर जमिनीवर हे उद्यान विकसित केले जाणार होते.
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा
नवी मुंबईमधील एकाही ठिकाणास पर्यटनस्थळाचा दर्जा नाही. गवळीदेवला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळेल व गैरसोयी दूर होतील अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.
गवळीदेव धबधबा हा ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित धबधबा आहे. नवी मुंबईला निसर्गाचे लाभलेले वरदान असून येथे येणाºया पर्यटकांसाठी काहीही सुविधा नाहीत. येथील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने येथील गैरसोयी दूर केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल.
- सचिन पवार, पर्यटक
मोरबेचा प्रकल्पही बारगळला
महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण आहे. याठिकाणी १०० एकरपेक्षा जास्त भूभागाचा काहीही वापर होत नाही. येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठीचा एक प्रस्तावही सर्वसाधारण सभेत आणला होता, परंतु तो विषय बारगळला आहे.
अर्थसंकल्पात फक्त तरतूद
नवी मुंबईमधील गवळीदेव, अडवली भूतावली निसर्ग पर्यटनस्थळ, खाडीकिनाºयावर कृत्रिम चौपाटी विकसित करणे, मोरबे धरण परिसरात पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी प्रत्येक वर्षी तरतूद केली जात आहे. पण प्रत्यक्षात काहीही खर्च केला जात नाही.