गावांचा विकास आव्हानात्मक
By admin | Published: May 6, 2017 06:26 AM2017-05-06T06:26:47+5:302017-05-06T06:26:47+5:30
नवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा
अरूणकुमार मेहत्रे/ लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा विकास करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेसमोर असणार आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण, रस्ते, गटारे या सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. याठिकाणी अ, आ, ईपासून सुरूवात करावी लागणार आहे.
सिडकोने येथील जमीन संपादित करताना गावठाणांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले. या कारणाने वसाहती जरी झकास झाल्या असल्या तरी गावे मात्र भकासच राहिले आहेत.
पनवेल महानगरपालिकेत २९ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी बरेचशी गावे प्रभाग १ ते ३ मध्ये येतात. त्या गावांपर्यंत नागरीकरण सुध्दा आले आहे तसेच टोलेजंग इमारती उभा राहिल्या आहेत. असे असले तरी पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. दळवळणाकरिता रस्ते उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता येथे गटारे नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता मलनि:सारण केंद्रे नाहीत की घनकचरा उचलला जात नाही. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था नाही. अनेक ग्रामपंचायती हा कचरा महामार्गालगत किंवा नदीच्या पात्रात डम्प करीत होत्या आणि महापालिका झाल्यानंतरही बदललेली नाही. जी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या व्यतिरिक्त या भागात रस्त्यांची निर्मिती करणे सुध्दा अतिशय अवघड याचे कारण म्हणजे मनाला वाटेल त्या ठिकाणी इमारती, घरे उभारण्यात आलेले आहे. गावागावांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीत अडचणी येणार आहे. घनकचरा उचलण्याकरिता वेगळी यंत्रणा उभारावी लागेल त्याशिवाय त्याची विल्हेवाट लावायची कुठे आणि कशी याबाबत नियोजन करावे लागणार आहे. महापालिका हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये मलनि:सारण केंदे्र उभारावी लागतील त्याकरिता जागेची उपलब्धता करावी लागणार आहे.
अनिधकृत बांधकामे जास्त
बिनशेती परवाना त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंगची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीची घरबांधणी परवाना घेवून टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. हे बांधकाम करताना एफएसआय त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी याचा विचार करण्यात आलेला नाही.
तीनही प्रभागांना प्रदूषणाचा विळखा
तळोजा एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या या तीनही प्रभागाला प्रदूषणाचा विळखा आहे. कारखाने मोठ्या प्रमाणात हवेत विषारी वायू सोडत आहेत. त्याचबरोबर रसायनमिश्रित सांडपाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. प्रभाग क्र मांक-१च्या हद्दीत सिडकोचे डम्पिग ग्राउंड आहे. त्या ठिकाणी शास्त्रशुध्द पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कचरा डम्प करू दिला जात नाही.