नामदेव मोरेनवी मुंबई : कामगार संघटनांच्या पाठपुराव्यानंतर तुर्भे रेल्वे यार्डमधील प्लॅटफॉर्म व छत दुरुस्तीचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. सद्यस्थितीमध्ये हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रखडलेल्या कामाचा परिणाम रोजगारावरही होऊ लागल्याने कामगारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई व उपनगरांमधील प्रमुख रेल्वे यार्डमध्ये तुर्भेचाही समावेश आहे. या ठिकाणी देशाच्या विविध भागांमधून सिमेंट, धान्य व इतर माल येत असतो. पूर्वी प्रत्येक महिन्याला २० ते २५ वॅगन यायच्या, त्यामधून मालाची चढ-उतार करण्यासाठी ७०० पेक्षा जास्त माथाडी कामगार काम करत आहेत; परंतु मागील काही वर्षांमध्ये रेल्वे यार्डमधील समस्या वाढत गेल्या. खराब रस्ते, खचलेले प्लॅटफॉर्म व छतावरील उडालेले पत्रे यामुळे या ठिकाणी माल कमी येऊ लागला. पावसाळ्यामध्ये छतामधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्यामुळे धान्य व सिमेंट भिजल्याच्या घटनाही घडल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने व कामगारांनीही माल यार्डच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू केला होता.
तीन ते चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने सर्वप्रथम रोडचे काँक्रीटीकरण केले. रोडच्या एक लेनची दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर प्लॅटफॉर्म छत दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक महिन्यापासून दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. यामुळे कामगारांनीही व येथे माल मागविणाऱ्यांनीही प्रशासनाचे आभार मानले होते; पण प्रत्यक्षात ठेकेदाराकडून काम गतीने केले जात नाही.एक महिन्यानंतर दहा टक्के कामही पूर्ण झालेले नाही. प्लॅटफॉर्मवर ५५ ब्लॉक असून, त्यामधील पाच ब्लॉकचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० ब्लॉकमधील प्लॅटफार्मचे काम पावसाळ्यापूर्वी कसे पूर्ण केले जाणार, असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत.छताच्या दुरुस्तीचे काम शेवटच्या टोकापासून सुरू आहे. लोखंडी सांगाडा बसविण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे; परंतु त्यावर अद्याप पत्रे बसविण्यात आलेले नाहीत. अनेक ठिकाणी अद्याप लोखंडी सांगाडाही बसविण्यात आलेला नाही. काही ठिकाणी प्लॅटफार्म खचलेला असून, त्याची दुरुस्तीही होणे आवश्यक आहे. माथाडी कामगारांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. कामाचा वेग वाढविला नाही तर पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होणार नाही. यामुळे पावसाळ्यात पुन्हा गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने फलक लावणे आवश्यक होते. त्या फलकावर कामाचे स्वरूप, ठेकेदाराचे नाव, काम
कधी मंजूर केले, कामासाठी कितीनिधी द्यावा लागणार व इतर सर्व माहितीचा तपशील लिहिणे आवश्यक आहे; पण प्रत्यक्षात अशाप्रकारचा कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही.
अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षरेल्वे यार्डमधील कामाविषयी माहिती घेण्यासाठी येथील कार्यालयात संपर्क साधला असता, अभियांत्रिकी विभागाचे कोणीही अधिकारी येथे नसतात, अशी माहिती मिळाली. जुईनगरमध्ये अधिकारी बसतात, अशी माहिती देण्यात आली.
जुईनगरमधील रेल्वे कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता रेल्वे यार्डचे काम पाहणारे अधिकारी येथे नसतात. तेथील कामकाज नक्की कोठून चालते, याची माहिती जुईनगरमधील अभियांत्रिकी विभागालाही देता आली नाही.
मालाची आवकही झाली कमीतुर्भे रेल्वे यार्डमध्ये प्रत्येक महिन्याला २० ते २५ वॅगनमधील सिमेंट व धान्याची आवक होत होती; परंतु येथील समस्यांमुळे गत तीन वर्षांमध्ये सातत्याने वॅगनची संख्या कमी होऊ लागली. सद्यस्थितीमध्ये महिन्याला चार ते पाच वॅगनचीच आवक होत आहे, यामुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण केले जावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.