शहरात विकासाची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:18 AM2018-07-22T01:18:21+5:302018-07-22T01:18:40+5:30

४०० कोटींचे प्रस्ताव; उड्डाणपूल, रस्ते, पदपथासह पादचारी पुलांचाही समावेश

Developmental flights in the city | शहरात विकासाची उड्डाणे

शहरात विकासाची उड्डाणे

Next

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने शहर विकासाच्या कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहर गतिशील योजनेसह ५४ प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे. तीन वर्षांमध्ये प्रथमच एका सभेमध्ये ४०० कोटी रुपये खर्चाचे ठराव मंजुरीसाठी आले असून, यामध्ये उड्डाणपूल, रस्ते, पदपथांसह पादचारी पुलांचाही समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर विकासकामे होत नसल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या वर्षी निधी नसल्यामुळे विकासकामे झाली नाहीत. त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या भांडणामुळे अपेक्षित गतीने कामे होऊ शकली नाहीत. डॉ. रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित केले. पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी करण्यात प्रशासनाने यश मिळविले. ठेवी वाढल्या; परंतु विकासकामे होत नसल्यामुळे स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक स्पष्ट नाराजी व्यक्त करत होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी दोन वर्षे शहराचा अभ्यास करून विकासाला गती देण्यास सुरुवात केली आहे. शहर गतिशीलता योजना तयार केली असून, त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल, पादचारी भुयारी मार्ग व जलमार्गाचाही समावेश आहे. जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्येही तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तीन वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रस्ताव आले असल्यामुळे नगरसेवकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी वारंवार केली होती. प्रशासनाने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी २४ कोटी ७६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे पाठविण्यात आला आहे. घणसोली नोड हस्तांतर झाल्यानंतर तेथील विकासकामांनाही गती देण्यास सुरुवात केली असून, रस्ते, पदपथ निर्मितीसाठी १२ कोटी ६५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पार्किंगचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेलापूर सेक्टर-१५ मध्ये वाहनतळ विकसित करण्यासाठी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. महापालिकेमधील कंत्राटी कामगारांना वेतनामधील फरकाचे ७० कोटी रुपये देण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार
महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून गणवेश मिळालेले नाहीत. पहिला गणवेश खरेदी करा व नंतर अनुदान देण्याच्या पद्धतीमुळे हजारो विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले होते. या वर्षी पुन्हा पूर्ववत महानगरपालिका गणवेशपुरवठा करणार आहे. तब्बल ४१४५३ विद्यार्थ्यांना गणवेश, पी.टी. व स्काउट गाइडचा गणवेश दिला जाणार असून, त्यासाठी आठ कोटी ११ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पादचारी पुलांचाही समावेश
महानगरपालिका नेरुळ सेक्टर-२१, ठाणे-बेलापूर रोडवर पावणे, कोपरखैरणे डी-मार्टजवळ पादचारी पूल बांधणार असून, त्याविषयी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आले आहेत.

शहरात एलईडी दिवे
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. ईईएसएलच्या माध्यमातून जवळपास ४८ कोटी रुपये खर्च करून पूर्ण शहरात एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. यामुळे वीजबिलांमध्ये बचत होणार असून, महापालिकेने संबंधित कंपनीला सात वर्षांमध्ये १०६ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे.

विषय आणि खर्च
तुर्भे रेल्वस्थानकासमोर उड्डाणपूल बांधणे - २४ कोटी ७६ लाख
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप - ८ कोटी ११ लाख
कंत्राटी कामगारांना किमान वेतनाचा फरक देणे - ७० कोटी
नेरुळ सेक्टर-२१ मध्ये पादचारी भुयारीमार्ग - १ कोटी ६४ लाख
उद्यानांच्या देखभालीसाठी कंत्राटदार नियुक्त करणे - ३५ कोटी ३७ लाख
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार - ३१ कोटी ४२ लाख
नेरुळ सेक्टर १५ मधील फकिरा मंडईचा विकास - ५६ लाख ७८ हजार
घणसोलीमध्ये रस्ते पदपथ निर्मिती - १२ कोटी ६५ लाख
वाशी सेक्टर-१५, १६ मध्ये गटार बांधणे - ७ कोटी ७४ लाख
मनपा क्षेत्रामध्ये एलईडी दिवे बसविणे - १०६ कोटी ८३ लाख
बेलापूर सेक्टर-१५ मध्ये बहुमजली वाहनतळ विकसित करणे - २७ कोटी ६६ लाख
कोपरी गावामध्ये अंगणवाडी, बालवाडीसह बहुउद्देशीय इमारत - ३ कोटी २९ लाख
कोपरखैरणे डी-मार्टजवळ पादचारी पूल बांधणे - ८ कोटी ४० लाख
पावणे पुलाजवळ पूल बांधणे - २ कोटी ५२ लाख
कोपरखैरणेमध्ये वीजवाहिनी भूमिगत करणे - ४ कोटी ९ लाख
दिघा, कोपरखैरणेमधील गंजलेले खांब बदलणे - ३ कोटी ९५ लाख
नेरुळ सेक्टर-२६ मध्ये संरक्षण भिंत बांधणे - ९८ लाख १७ हजार
कोपरखैरणे सेक्टर-२३ मध्ये शाळेची नवीन इमारत बांधणे - १० कोटी ६७ लाख
 

Web Title: Developmental flights in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.