शेगावला जाणाऱ्या भाविकांना मिळाली नववर्षाची भेट, कोकण रेल्वेची विशेष गाडी शेगावला थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:52 AM2023-01-01T06:52:10+5:302023-01-01T06:52:46+5:30
नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस (०११३९) ही विशेष गाडी धावते
नवी मुंबई : शेगावचे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कोकणातील भाविकांसाठी कोकण रेल्वेने नवीन वर्षात खुशखबर दिली आहे. नागपूर ते मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला ४ जानेवारीपासून शेगाव स्थानकात थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस (०११३९) ही विशेष गाडी धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी भाविकांची जुनी मागणी होती. त्यानुसार कोकण रेल्वेने नागपूर-मडगाव विशेष एक्सप्रेसला ४ जानेवारी २०२३ पासून थांबा मंजूर केला आहे.
भाविकांना मिळणार दिलासा
विदर्भातून शेगावला येणाऱ्या भाविकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. आता या विशेष गाडीला शेगाव स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आल्याने कोकणासह विदर्भातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वर्षात रेल्वे प्रशासनाने भाविक, प्रवाशांना भेट दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या थांब्यामुळे प्रवाशांची जुनी मागणी मान्य झाली आहे. कोकणातील भाविकांच्यादृष्टीने हा थांबा खूपच फायदेशीर ठरणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.
थांबा कधी?
नागपूर-मडगाव मार्गावर धावताना ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक बुधवारी आणि रविवारी सुटणारी मडगाव ते नागपूर (गाडी क्रमांक ०११४०) ही विशेष एक्सप्रेस ५ जानेवारी २०२३ पासून शेगाव स्थानकावर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.