लॉकडाउनमुळे शहरातील उद्याने ओस; दोन महिन्यांपासून बच्चे कंपनीघरातच बंदिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:21 AM2020-05-28T00:21:14+5:302020-05-28T00:21:48+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले आहे.
कळंबोली : कोरोना विषाणूने लहान मुलांचा आनंदही हिरावून घेतला आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये धमाल करणाऱ्या मुलांना यंदाच्या सुट्ट्या घरातच घालवाव्या लागत आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील उद्याने ओस पडली आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. परीक्षांअगोदरच सुट्ट्या, त्यानंतर परीक्षाही रद्द करण्यात आल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता सुट्ट्या लागल्याने नेहमीप्रमाणे थंड हवेच्या ठिकाणी जायला मिळेल, दररोज आपल्या परिसरातील उद्यानात खेळायला मिळेल, मामाच्या गावी जायला मिळेल, इतर काही गोष्टी यंदा करायला मिळतील... अशा अनेक योजना मुलांच्या मनात उत्साह निर्माण करीत होत्या. परंतु लहान मुलांचा उत्साह कोरोनाने हिरावून घेतला आहे.
कधीही घरात न थांबणारी, शाळेत शांत न बसणारी ही मुले गेल्या दोन महिन्यांपासून घरातच बंदिस्त आहेत. पनवेल परिसरातील अनेक शहरे सिडकोने निर्माण केली आहेत. सिडको वसाहतींना सुविधा त्याच प्राधिकरणाकडून दिल्या जात आहेत. सिडको वसाहतीत नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा या सिडको कॉलनीत लहान-मोठी १७० उद्याने तयार करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळण्याकरिता खेळणी बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे बांधण्यात आली आहेत. उद्यानात सावलीसाठी झाडे तसेच बसण्याकरिता सिमेंटची आसने लावण्यात आली आहेत.
नवीन पनवेल येथील सेक्टर १२, १५, १६ , कळंबोली येथील स्मृती गार्डन, करवली चौकातील उद्यान, खारघरमधील सेंटर पार्क, आद्य क्रांतिवीर बळवंत फडके उद्यान, खांदा वसाहतीतील उद्याने कोरोनामुळे ओस पडली आहेत. सर्व उद्याने निर्मनुष्य झाली आहेत.
लहान मुले टीव्ही आणि मोबाइलमध्ये रमली
लॉकडाउन काळात टीव्ही आणि मोबाइल हे दोनच पर्याय लहान मुलांना विरंगुळ्यासाठी राहिलेले आहेत. तर काही मुले बुद्धिबळ, कॅरम, सापसिडी, लुडो असे अनेक बैठे खेळ खेळत आहेत. त्याचबरोबर चित्रकला, हस्तकलेसारख्या कलागुणांना वाव देतानाही दिसत आहेत. नृत्य आणि गायनाची आवड असणारी मुले कुटुंबाचे मनोरंजन करीत आहेत. लॉकडाउनचा वेळ जात असला तरी वारंवार त्याच त्याच गोष्टी करून मुलेही वैतागली आहेत.
या काळात लहान मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळले
लॉकडाउन काळात वारंवार टीव्ही व मोबाइल पाहत असल्याने घराबाहेर कोरोना असल्याचे त्यांनाही पुरते कळले आहे. सॅनिटायझर, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कंटेन्मेंट झोन, कॉरंटाइन, रेड झोन, ग्रीन झोन, अत्यावश्यक वस्तू, अनावश्यक बाहेर गेल्यास मिळणारा पोलिसांचा मार या सर्व गोष्टी मुलांना तोंडपाठ झाल्या आहेत. कोरोनाच्या या महामारीत स्वच्छतेचे महत्त्व अधिक असल्याचेही लहान मुलांना आता कळले आहे.