प्रशासनातील गटबाजीचे सभेत धिंडवडे
By admin | Published: January 21, 2016 02:53 AM2016-01-21T02:53:04+5:302016-01-21T02:53:04+5:30
महानगरपालिकेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील गटबाजीचे बुधवारी सर्वसाधारण सभेत धिंडवडे निघाले. राजकारण्यांपेक्षा जास्त
नवी मुंबई : महानगरपालिकेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील गटबाजीचे बुधवारी सर्वसाधारण सभेत धिंडवडे निघाले. राजकारण्यांपेक्षा जास्त राजकारण प्रशासनामध्ये सुरू आहे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. उपमहापौर अविनाश लाड यांनीही चुकीच्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला.
आरोग्य विभागामधील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला आले होते. या प्रश्नावर वादळी चर्चा झाली. शिवसेनेचे एम.के. मढवी यांनी मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. प्रशासनामध्ये प्रचंड गटबाजी सुरू आहे. राजकारण्यांपेक्षा जास्त राजकारण सुरू आहे. काही अधिकारी महापालिकेमधील माहिती चोरून बाहेरील व्यक्तींना देत असून त्यामुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत असल्याचे मत व्यक्त केले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पदोन्नतीच्या विषयावर सुरू असलेल्या गोंधळाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. एम.के. मढवी यांनी घेतलेल्या आक्षेपांचीही शहानिशा करावी अशा सूचना प्रशासनास केल्या. डॉ. रमेश निकम यांच्यावर २००३ पासून अन्याय करण्यात आला. मागासवर्गीय संघटनेने नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचा प्रस्ताव मंजुरीला आणण्याचेही निदर्शनास आणून दिले. पदोन्नतीसाठी प्रशासनाने खोटी माहिती दिली आहे. तीनही अधिकाऱ्यांच्यासमोर त्यांच्याकडे कोणता कार्यभार आहे ते लिहिले आहे. परंतु ठरावातील उल्लेख व त्यांच्याकडील प्रत्यक्षामधील काम यामध्ये तफावत असल्याचे उपमहापौर अविनाश लाड यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)