वाकण-खोपोली मार्गावर कामामुळे धुळीचे साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:44 PM2019-10-19T23:44:49+5:302019-10-19T23:45:08+5:30
वाहनचालक, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, रस्ता रुंदीकरणाचे काम वेगात
- विनोद भोईर
पाली : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाची रुंदीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. हे कामे सुरू असताना येथील मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक, व्यावसायिकांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
मार्गावर वाकण ते पाली, रासळ, चिवे, परळी, दुधाणवाडी, उंबरे, शेबडी, मिरकुट वाडी ते पाली फाटा या ठिकाणी धुरळ्याची सर्वात अधिक समस्या आहे. मोटारसायकलस्वारांचे धुळीमुळे हाल होत आहेत.
या मार्गावरून जाताना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घातलेले असतानासुद्धा नाकातोंडात धूळ जाते. श्वसनाचे विकार असलेल्यांसह लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. तर धुरळा उडत असल्याने समोरून ये-जा करणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे.
पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचा वापर केला होता. आता यावरून वाहने जाऊन येथून धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांना होत आहे, तसेच महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवासीही धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. हा धुरळा वाहनचालक आणि प्रवाशांच्या अंगावर सर्वत्र बसतो. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे या धुळीमुळे हाल होत आहेत. वारंवार उडणारी धूळ खाद्यपदार्थ आणि वस्तूंवरही बसते. त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते.
हॉटेलमधील खाद्य पदार्थ, दुकानातील व घरातील वस्तू आणि उपकरणे धुळीमुळे खराब होतात. त्यामुळे या मार्गाचे काम जलद गतीने करण्याची मागणी व्यावसायिक, चालक व प्रवाशांकडून होत आहे. मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने समोरून येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून माती बसण्यासाठी पाणीही टाकले जात नाही. जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत. या धुळीमुळे चालक, दुचाकीस्वार व प्रवाशांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांना आणि परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे आजार होत आहेत.