मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य; आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:32 AM2019-09-25T00:32:08+5:302019-09-25T00:32:28+5:30
नवी मुंबईमध्येही धूलिकणांचे प्रमाण वाढले
पनवेल : नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये दोन दिवसांपासून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गासह सायन-पनवेल महामार्गावर धूलिकणांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई, पनवेल परिसराला दोन महिने पावसाने झोडपले होते. सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. रोडवर चिखलही साचला होता. दोन दिवसांपासून पाऊस उघडल्यामुळे दोन्ही महामार्ग व अंतर्गत रोडवरही वाहनांमुळे धूळ उडू लागली आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे या रोडवर धुळीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसू लागला असून परिसरातील धूलिकणांचे प्रमाणही वाढले आहे. उरण रोडवरही धुळीचे प्रमाण वाढले आहे.
नवी मुंबईमध्ये सानपाडा रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले आहे. ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक बसविल्यानंतर त्यावरील मातीचे ढिगारे हलविण्यात आलेले नाहीत. वाहनांच्या टायरमुळे सर्व धूळ परिसरात पसरत आहे. धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.