डायल ११२ : मदतीला धावण्यात नवी मुंबई पोलिस दुसरे; मीरा भाईंदरची राज्यात आघाडी
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 14, 2023 04:13 PM2023-02-14T16:13:20+5:302023-02-14T16:15:36+5:30
मीरा भाईंदर सर्वसाधारण साडेपाच मिनिटाच्या आत मदतीला धावून जात आहेत.
नवी मुंबई : नागरिकांना मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या ११२ या हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीला रिस्पॉन्स देण्यात नवी मुंबईपोलिस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. काही महिन्यांपूर्वी १४ मिनिटांवर असलेला त्यांचा रिस्पॉन्स टाइम पाच ते सहा मिनिटांवर पोहचला आहे. तर मीरा भाईंदर सर्वसाधारण साडेपाच मिनिटाच्या आत मदतीला धावून जात आहेत.
राज्यात सुरु करण्यात आलेली ११२ हेल्पलाईन येत्या काळात संपूर्ण देशासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे हि हेल्पलाईन अधिकाधिक प्रभावी व्हावी व गरजूंना त्याद्वारे मदत मिळावी यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार हेल्पलाईनवर तक्रार मिळताच कमीत कमी वेळेत पोलिसांची मदत त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे यावर भर दिला जात आहे. त्यानुसार मागील वर्षभराचा आढाव्यात नवी मुंबई पोलिस दुसऱ्या क्रमांकावर मजल मारू शकले आहेत. हेल्पाईन सुरु झाली तेंव्हा १४ मिनिटावर असलेला रिस्पॉन्स कालावधी कमी करून तो ५ ते ६ मिनिटावर पोहचला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. प्रथम क्रमांकावर मीरा भाईंदर पोलिस असून त्यांचा रिस्पॉन्स टाईम हा साडेपाच मिनिटाहून कमी आहे. तर पहिल्या दहामध्ये नवी मुंबई पोलिसांनंतर औरंगाबाद शहर, नाशिक शहर, ठाणे शहर, सोलापूर शहर, नागपूर शहर, अमरावती शहर, पिंपरी चिंचवड व दहाव्या क्रमांकावर पुणे शहर पोलिस आहेत. त्यांचा रिस्पॉन्स कालावधी हा साडेबारा मिनिटाचा आहे.
ग्रामीण व शहरी भागात रिस्पॉन्स टाईम मध्ये अंतर असल्याचे कायदा व सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी सांगितले. भौगोलिक दृष्ट्या शहरी भागाचे अंतर कमी असते. त्यामुळे कमीत कमी वेळेत पोलिस एखाद्या ठिकाणी पोहचू शकतात. मात्र ग्रामीण भागातली गावे दूर दूरवर असतात. त्यामुळे तिथपर्यंत पोहचहयला पोलिसांना काहीसा जास्त कालावधी लागतो. त्यानंतर देखील हा रिस्पॉन्स टाईम कमी कसा करता येईल यावर अभ्यास सुरु असल्याचेही त्यांनी वाशी येथे सांगितले.