सिडकोने १९ हजार घरांचा प्रकल्प गुंडाळला? घरे विकली जात नसल्याने प्रशासनाचा घेतला निर्णय
By कमलाकर कांबळे | Updated: March 18, 2025 11:33 IST2025-03-18T11:32:17+5:302025-03-18T11:33:31+5:30
ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली १८,८२० टू बीएचके घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सिडकोने १९ हजार घरांचा प्रकल्प गुंडाळला? घरे विकली जात नसल्याने प्रशासनाचा घेतला निर्णय
नवी मुंबई : सिडकोची घरे विक्रीविना पडून आहेत. गेल्या सात वर्षांत बांधलेल्या २५ हजार घरांपैकी जवळपास सात हजार घरांना ग्राहक मिळताना दिसत नाही. अलीकडेच जाहीर केलेल्या २६ हजार घरांनासुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी सिडकोची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकून पडली आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली १८,८२० टू बीएचके घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी घरांची निर्मिती करणाऱ्या सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मध्यमवर्गीयांनाही दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत नावडे नोडमध्ये खास मध्यमवर्गीयांसाठी दोन खोल्यांची अर्थात टू बीएचकेच्या घरांची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार केला. या नियोजित वसाहतीत १८ हजार ८२० घरे प्रस्तावित होती.
मागील काही वर्षांत सिडकोने बजेटमधील घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली आहे; परंतु विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात घरे विक्रीविना पडून आहेत. सिडकोच्या या धोरणामुळे मध्यमवर्गीय ग्राहक उपेक्षित राहिला आहे. त्यांच्या गृहस्वप्नांना खिंडार पडले आहे. या पार्श्वभूमीवर नावडे नोडमध्ये टूबीएचके घरांची स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. विशेष म्हणजे २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती.
आर्थिक पेच निर्माण
विशेष म्हणजे या प्रस्तावाला संचालक मंडळाची मान्यताही मिळाली होती; मात्र मागील आठ वर्षांत विविध नोडमध्ये विविध घटकांसाठी बांधलेली घरेच विकली जात नसल्याने सिडकोसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर नावडेमध्ये मध्यम आणि उच्च वर्गीयांसाठी नियोजित केलेला घरांचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती सिडकोतील सूत्राने दिली.