कळंबोली : आसूडगाव बस आगारासमोरील भारत पेट्रोलियमच्या पंपावर डिझेल खाली करताना एका टँकरला मंगळवारी सकाळी आग लागली. त्यामध्ये डिझेल टँकरसह आणखी दोन वाहने जळाली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. एनएच -४ आणि एनएच ४ बी या दोन राष्ट्रीय महामार्गांलगत हा पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी पेट्रोल, डिझेल भरण्याकरिता वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मंगळवारी शिवडी टेपोतून २० हजार लिटर डिझेल भरून एमएच ४६ एफ ८०१२ या क्र माकांचा टँकर सकाळी पावणेदहाच्या सुमारास भारत पेट्रोलिअमच्या विक्ट्री आॅटोमोबाइल्स पेट्रोलपंपवर आला. डिझेल खाली करताना टँकरने अचानक पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी जास्त होती, की त्यामुळे बाजूला असलेल्या एमएच१२एडी५५६९ व आणखी एक ट्रेलरलाही आग लागली. पेट्रोल पंपावर लागलेल्या आगीची माहिती मिळताच सिडकोच्या खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील केंद्रांतील चार आणि पनवेल नगरपालिकेचा एक असे पाच बंब दाखल आले. ६५ जवानांनी अथक प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणली. घटनास्थळी पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांनी भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनांतर्गत माहिती घेऊन सूचना केल्या. कामोठे पोलीस आणि कळंबोली वाहतूकच्या कर्मचाऱ्यांनी या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. आग कशामुळे लागली, याबाबत तपास सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी सांगितले. (वार्ताहर)...म्हणून इतर वाहने वाचलीपेट्रोल पंपावर बेकायदेशीरीत्या अवजड वाहने उभे केली जातात. डिझेल टँकरला आग लागल्याने बाजूला असलेली दोन वाहने आगीत भस्मसात झाली. इतर वाहनेही आगीत खाक झाली असती, मात्र वाहनचालक नेताजी भोईर यांनी जीवाची पर्वा न करता तीन ते चार वाहने स्टार्टर मारून बाजूला काढली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी टळली. डिझेल खाली करताना स्टॅटीज चॅर्जेस क्लॅम्प लावण्यात आली नव्हती. ती न लावल्याने हवेशी संपर्क येऊन आग लागली.- विजय राणे, उपमुख्य अधिकारी, सिडको
डिझेल टँकरला भीषण आग!
By admin | Published: April 13, 2016 12:33 AM