भंगार व्यावसायिकांमुळे दिघावासियांचा कोंडतोय श्वास
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 20, 2023 09:02 PM2023-12-20T21:02:12+5:302023-12-20T21:03:01+5:30
परिसरावर धुराचे लोट : धातुसाठी पेटवल्या जातात वायरी, उपकरणे
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भंगार व्यावसायिकांकडून पेटवल्या जाणाऱ्या वायरी, टायर यासह इतर विद्युत उपकरणांमुळे दिघा एमआयडीसी तसेच चिंचपाडा परिसरावर धुरांचे लोट पसरत आहेत. रहिवासी भागात तसेच मोकळ्या जागेत चालणाऱ्या या प्रकारामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. त्यानंतरही शहरातील प्रदूषणात भर टाकणाऱ्या भंगावर व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मागील काही महिन्यांपासून नवी मुंबईच्या प्रदूषणाची पातळी घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ठिकठिकाणी उग्र वास येण्याचे, डोळे जळजळ होण्याचेही प्रकार घडले होते. यानंतरही नवी मुंबईच्या प्रदूषणात सुधारासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून एमआयडीसी क्षेत्रातील भंगार व्यावसायिकांकडून टायर, वायरी तसेच इतर विद्युत उपकरणे जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामधील धातू मिळवण्यासाठी रबरचे आवरण असलेले हे साहित्य जाळले जाते. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात धूर व उग्र वास परिसरात पसरत असतो. अशाच प्रकारे दिघा एमआयडीसी, चिंचपाडा लगत पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी लोकवस्तीला लागून व मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत.
रात्र होताच त्यांच्याकडून दिवसभर जमा झालेल्या वायरी, विद्युत उपकरणे पेटवून त्यामधील धातू काढण्याचे काम केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात टायर जाळले जातात. रहिवासी भागात ड्रम मध्येच टायर पेटवून हा प्रकार चालतो. त्यामुळे संध्याकाळ होऊ लागताच ठिकठिकाणी नागरिकांना उग्र वासाला व धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात वृद्ध व्यक्ती व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे. तर सततच्या उग्र वास व धुरामुळे काहींना श्वसनाचे त्रास देखील होऊ लागले आहेत. परंतु उघडपणे हा प्रकार चालत असतानाही स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेही त्याकडे लक्ष जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
सुस्त प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. भंगार व्यावसायिक टायर व इतर उपकरणे जाळत असल्याने त्याचा धूर रहिवाशी भागावर पसरत आहे. यामुळे अनेकांना ठसक्याचा त्रास होत असून सातत्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. वेळीच हा प्रकार न थांबल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. जगदीश गवते. माजी नगरसेवक.