दिघी बंदर रेल्वेला जोडणार !
By admin | Published: September 14, 2016 04:43 AM2016-09-14T04:43:34+5:302016-09-14T04:43:34+5:30
कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे
नितीन देशमुख, पनवेल
कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला रोह्याशी जोडणाऱ्या मार्गबाबत सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रेल्वे स्थानकाच्या भुमिपूजनासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नुकतेच येथे आले होते. रेल्वे मार्गामुळे कोकण उर्वरित महाराष्ट्राला जोडले जाऊन विकासाच्या वाटा उघडणार आहेत. पुढील काही वर्षात रेल्वे क्षेत्रात जवळपास १५० अब्ज रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून एल.आय.सी. आणि रेल्वे पायाभूत घटक हे याचे प्रमुख आर्थिक स्त्रोत आहेत. देशभरातील रेल्वे मार्गाच्या जोडणीसाठी तब्बल ८०५० कोटी रु पये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.
देशाला लाभलेल्या साडेसात हजार किलोमीटर किनारपट्टीपैकी १० टक्के किनारपट्टी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील नैसर्गिक साधन संपत्ती, शेत माल, परदेशात पाठवण्यासाठी किंवा या मालासाठी लागणाऱ्या आणि आयात होणाऱ्या उपयुक्त वस्तु परदेशातून आणण्यासाठी कोकण किनारपट्टीवरील बंदरे उपयुक्त आहेत. बंदरांचा विकास करण्यासाठी दिघी बंदर लिमिटेड या खाजगी कंपनी बरोबर होणारा करार महत्वाचा ठरणार आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. रेल्वे विकास निगमचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्नीहोत्री आणि दिघी पोर्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री हे रोहा - दिघी पोर्ट रेल्वे मार्ग जोडणी करारावर लवकरच स्वाक्षरी करणार आहेत.
करारावर स्वाक्षरी करण्याच्या वेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा, रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद व राज्याचे परिवहन सचिव गौतम चटर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा होणारा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे.