जेएनपीटी बंदराच्या अध्यक्षपदी दिघीकर
By admin | Published: August 27, 2015 11:55 PM2015-08-27T23:55:54+5:302015-08-27T23:55:54+5:30
जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अनिल दिघीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. दिघीकर हे जेएनपीटीचे १६ वे अध्यक्ष म्हणून
उरण : जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अनिल दिघीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. दिघीकर हे जेएनपीटीचे १६ वे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर अरुण बोंगिरवार यांच्यानंतर जेएनपीटीच्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत दिघीकर हे दुसरे मराठी अध्यक्ष ठरणार आहेत.
जेएनपीटी बंदराची स्थापना २६ मे १९८९ रोजी झाली. तेव्हापासून जानेवारी २००१ ते २००२ या दरम्यानचा एकमेव कालखंड वगळता २६ वर्षांच्या कालखंडात जेएनपीटी बंदराच्या अध्यक्षपदाची सूत्रे केंद्राने सातत्याने अमराठी माणसांच्याच हाती सोपविली आहेत. अरुण बोंगिरवार यांनी अध्यक्षपदाची धुरा २९ जानेवारी २००१ ते १७ आॅक्टोबर २००२ दरम्यान फक्त २२ महिनेच सांभाळली आहे.
बोंगिरवार यांचा अपवाद वगळता केंद्राला जेएनपीटीच्या अध्यक्षपदासाठी २६ वर्षात मराठी माणसाची नियुक्तीच झालेली नाही. फेबु्रवारी २०१५ पर्यंत जेएनपीटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार एन.कुमार यांच्याकडे होता. तेव्हापासून जेएनपीटीचे अध्यक्षपद रिक्त होते. दरम्यानच्या काळात जेएनपीटीचा कारभार उपाध्यक्ष नीरज बन्सल हे सांभाळत होते. केंद्रातील सत्तांतरानंतर नौकानयन विभागाचे मंत्रिपद नितीन गडकरी यांच्याकडे सोपविले आहे. त्यांनी सूत्रे हाती घेताच वर्षभरात जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अनिल दिघीकर यांनी नियुक्ती केली आहे. दिघीकर सध्या एमएसआरडीसीच्या महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. (वार्ताहर)