नवी मुंबई : २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची हजेरी डिजिटल ओळखपत्राद्वारे घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे ट्रॅकिंग करणे व प्रत्यक्ष हजर विद्यार्थ्यांची अचुक संख्या निश्चित होऊन त्याद्वारे इतर विविध योजना योग्यप्रकारे राबविणे शक्य होणार आहे.
शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनादेखील विविध सुविधा मोफत दिल्या जातात. महापालिकेने शहरात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, माध्यमाच्या शाळा तसेच सीबीएसई बोर्डाच्या शाळादेखील सुरू केल्या आहेत.
दरवर्षी विद्यार्थ्यांचा पट वाढत असल्याने शाळांच्या संख्येत देखील वाढ केली जात आहे. यादवनगर येथे झोपडपट्टी भागात ३ मजल्यांची सर्व सुविधायुक्त २८ खोल्यांची शाळा बांधण्याचे काम पूर्ण झालेले असून पुढील शैक्षणिक वर्षात ती सुरू करण्यात येणार आहे.
ई-रुपी प्रणाली सक्षम करणारशैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून शिक्षण विभागातील डीबीटी योजनेऐवजी ई-रुपी प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीनुसार विद्याथ्यांनी खरेदी केलेल्या वह्या, ऑल सिजन बूट, मोजे, दप्तर, रेनकोट इत्यादींच्या क्यूआर कोडनुसार तात्काळ रक्कम अदा करण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना १९ कोटी ५० लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
आर्टिफिशल इंटेलिजेन्स प्रयोगशाळा
१ - आजच्या शैक्षणिक प्रगतीचा वेग लक्षात घेता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान हे अभ्यासक्रमाचा भाग असणे ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंगसह आर्टिफिशल इंटेलिजेन्स प्रयोगशाळा ही प्रत्येक शाळेमध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे आधुनिक ज्ञान प्रात्यक्षिकासह प्राप्त करून घेणे सोपे होणार आहे.२ - महानगरपालिकेच्या एकूण ७८ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना' अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या निधीमधून 'सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशीअल इंटेलिजेन्स प्रयोगशाळा' सुरू करणार आहे.