डिजिटल बिलबोर्डमुळे वाहन अपघातांसह पक्ष्यांच्या अधिवासाला धोका!
By नारायण जाधव | Published: November 8, 2023 02:37 PM2023-11-08T14:37:25+5:302023-11-08T14:37:40+5:30
तत्काळ बंदी आणा, पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्याना पत्र
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: तेजोमय दिवाळी सर्वांचा आवडता सण आहे. दिवाळीच नव्हे तर इतर सणासुदीला केलेली रोषणाई सर्वांना आकर्षित करते. परंतु प्रखर डिजीटल बिलबोर्डांमुळे नवी मुंबईसह महामुंबईत वाहनांच्या अपघातासह पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचाली व अधिवासास धोका निर्माण झाल्याचा दावा पर्यावरणप्रेमी संघटनानी केला आहे. एवढेच नव्हे तर अशा डिजिटल बिलबोर्डांना तत्काळ मनाई करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई मेलद्वारा केली आहे.
वारंवार जाहिरात बदलणारे प्रखर लाइट्स कमालीचे त्रासदायक असतातच सोबत त्यामुळे सावधानतेमध्ये आलेल्या एका सेकंदाच्या व्यत्यय आणि विचलनाने देखील रहदारींच्या रस्त्यावर अपघात होऊ शकतात, तीन एनजीओंनी मुख्यमंत्र्यांना या आशयाचा ईमेल पाठवला आहे. हे लाइट्स अतिशय प्रखर असतात, त्यांच्या एका फ्लॅशने देखील व्हिज्युअल्स बदलू शकतात.
ते अतिशय त्रासदायक आणि विचलन करणारे असल्यामुळे एका झटक्याने सुद्धा चालकांना दिसेनासे होऊन भयंकर अपघातामध्ये पर्यवसनहोऊ शकते. या अपघातांमुळे गंभीर इजांसोबत कधीकधी कायम स्वरुपी व्यंग देखील येऊ शकते, रहदारी पाहता लोकमृत्यूमुखीदेखील पडू शकतात, असे नवी मुंबईतील नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले.
या गंभीर प्रखरतेचा आणखीन एक दुर्धर परिणाम म्हणजे यामुळे “प्रकाश प्रदूषण” होते, वन्यजीवांच्या खासकरुन पक्ष्यांच्या नैसर्गिक पध्दतींमध्ये अडचणी येतात, असे कुमार यांनी पुढे सांगितले. वॉचडॉग फाउंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या, सायन-पनवेल महामार्गावरच्या आणि अगदी बीकेसी कनेक्टरच्या डिजिटल बिलबोर्डांबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे, ते मारक होर्डिंग्ज साबित होऊ शकतात, कारण त्यामुळे मोटार चालकांचे लक्ष रस्त्यांवरुन सहजपणे ढळू शकते.
प्रकाश प्रदूषणामुळेदेखील वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होते आणि त्याप्रमाणे महामार्ग आणि रस्त्यांच्या लगतच्याघरांमध्ये लोकांच्या झोपेवर परिणाम होतो असे पिमेंटा म्हणाले. पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. मागच्या वर्षीच्या जागतील स्थलांतरीत पक्षी दिनाची थीम प्रकाश प्रदूषण होती. संपूर्ण वर्षभर कार्यक्रमाने प्रखर प्रकाशामुळे पक्षांच्या हालचालीवर होणा-या परिणामावर लक्ष केंद्रित केले होते. या प्रकाशामुळे पक्षी रस्ता चुकू शकतात आणि मृत्यूमुखी पडू शकतात, असे कुमार म्हणाले.
स्थलांतरीत पक्षी चांगल्या पर्यावरणाचे मूक दूत असतात, कारण ते जिथे कुठेही जातात तिथले चांगले गुणविशेष दिसून येतात, असे नॅटकनेक्टने सांगितले आहे. संस्थेने या उडणाया पाहुण्यांविषयी संवेदनशील असण्याची, सहानुभूती दाखवण्याची शहर व शासकीय संस्थांना विनंती केली आहे. ईमेलमध्ये हे नमुद करण्यात आले आहे की, मुख्यमंत्र्यांनी रहदारीच्या स्थितींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण ते स्वत: मुंबई ते ठाणे तसेच इतर अनेक ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे या सर्व परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले असावे. श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले, जाहिरातीच्या डिझाइनर्सनी जरी “सृजनात्मक यश” मिळवले असले तरी, खास करुन हे सांगावेसे वाटते की प्रखर प्रकाश ही खरंतर धोकादायक संकल्पना आहे. म्हणून, त्यांनी मुंबईतील या प्रखर संकल्पनेला समाप्त करावे अशी सूचना दिली. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे प्रखर प्रकाशाचे बिलबोर्ड्स इतर ठिकाणी उदा. द्रुतगती मार्ग, मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गापर्यंत पोहोचण्यापासून निर्बंधित करण्याची विनंती केली आहे.