महापे आदिवासी पाड्यात पालिकेची डिजिटल शाळा; बोलक्या भिंतींची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:32 PM2020-03-08T23:32:41+5:302020-03-08T23:33:05+5:30
गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न
नवी मुंबई : महापे येथील अडवली भुतावली या आदिवासी पाड्यातील नवी मुंबई महापालिकेची शाळा क्र मांक ४१ ही संपूर्ण डिजिटल करण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीसाठी तसेच डिजिटल क्लासरूम बनविण्यासाठी सीएसआर फंड आणि आमदार निधीचा वापर करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्र मानुसार बोलक्या भिंतींची निर्मिती करण्यात आली आहे.
महापे येथील अडवली भुतावली या आदिवासी पाड्यात १९६२ साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची कौलारू आणि पत्र्याची शाळा होती. महापालिकेच्या माध्यमातून या शाळेत बालवाडी ते आठवीपर्यंतचे वर्ग चालविले जात आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत आदिवासी समाजातील ४० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असून परिसरात राहणारी हिंदी भाषिक नागरिकांची ६० टक्के मुले शिक्षण घेत आहेत. एमआयडीसी भागातील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळेसाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. मुंबई येथील एम्पथी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करून शाळेची दोन माजली प्रशस्त इमारत बांधून देण्यात आली आहे. दरवर्षी या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन हजार वह्यांचे वाटप केले जाते.
शाळेचे कार्यालय आणि वर्गखोल्यांमध्ये टेबल आणि खुर्च्या तसेच ५० इंचांचा एलईडी टीव्हीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सुलेखनकार अच्युत पालव यांच्या माध्यमातून वर्गखोल्यांमधील भिंतींवर अभ्यासक्रमानुसार बोलक्या भिंतीची निर्मिती करण्यात आली आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १०० स्मार्ट बेंचदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर नैतिक मूल्यांकन आणि मूल्यशिक्षणदेखील देण्यात येते.
अडवली भुतावली येथील महापालिकेची शाळा क्र मांक ४१ ही संपूर्ण डिजिटल आहे. विद्यार्थ्यांचा पट वाढावा तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गरीब कुटुंबातील विद्यार्थी तसेच कचरावेचक मुलांनीदेखील शिक्षण घ्यावे यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यात येते. गरीब कुटुंबातील विद्यार्थी कुपोषित राहू नयेत यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना महिन्याला पाच किलो धान्य दिले जाते. महापालिका शाळेमध्ये राबविण्यात येणारे उपक्र म आणि डिजिटल शाळेमुळे परिसरातील खासगी शाळेतील विद्यार्थीदेखील महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. - भिकाजी सावंत (मुख्याध्यापक)
वृक्षसंगोपन आणि पर्यावरणाचा संदेश
शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. त्यांचे संवर्धन आणि संगोपन विद्यार्थी करतात. सदर शाळा निसर्गरम्य बनविण्यात आली असून यामुळे नैसर्गिक बटरफ्लाय गार्डन तयार झाले आहे. या ठिकाणी येणाऱ्या विविध पक्ष्यांसाठी पाण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. शाळेच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या गार्डनमुळे वृक्षसंगोपन आणि पर्यावरणाचा संदेश दिला जातो. यासाठी वृक्षप्रेमी शिक्षक महेंद्र भोये, आदी शिक्षक आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
स्वच्छ आणि सुंदर शाळा
अडवली भुतावली शाळेने कोपरखैरणे विभागातून सलग तीन वर्षे स्वच्छ आणि सुंदर शाळेचे प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले असून नवी मुंबई विभागातून दुसरा क्र मांक पटकावला आहे.