पोलादपूर काटेतळी मार्गावर कोसळली दरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:49 AM2019-07-31T01:49:28+5:302019-07-31T01:49:43+5:30
रहदारीचा रस्ता : जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला
पोलादपूर : पोलादपूर काटेतळी मार्गावरील पोलादपूर शहर व गणेशनगर दरम्यान झालेल्या पावसात डोंगर कड्यावरची माती व दगड खाली आल्याने हा मार्ग दुपारी ३ वाजता बंद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या शुभांगी संतोष चव्हाण यांनी तातडीची दखल घेत एलएलटीच्या जेसीबीच्या साहाय्याने सुमारे एका तासात दरड बाजूला करत मार्ग मोकळा केला.
पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील, पोलादपूर काटेतळी मार्गावरील गणेशनगर जवळ सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर दरड कोसळली, त्यामुळे तेथील सपूर्ण रस्ता बंद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या शुभांगी संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील रस्त्याची पाहणी केली. लगेच जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करून घेतला. या कामात तांबटभुवन मित्रमंडळ व गणेशनगर ग्रामस्थांनी सहकार्य केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.पोलादपूरमध्ये १३१.० मि.मी. पाऊस पडला आहे. आजपर्यंत एकूण २५२७.० मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसात गणेशनगर मार्गावर मातीसह दगड खाली आल्याने येथील रस्ता बंद झाला होता. त्यातच पावसाच्या सरी येत असल्याने चिखल झाला. या घटनेची तत्परतेने माहिती घेत चव्हाण यांनी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार एलएलटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देत जेसीबी उपलब्ध करून दरड व माती बाजूला करुन रस्ता पूर्ववत सुरू के ला.