पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनामार्फत दिव्यांगांना दिलेले आश्वासन पूर्ण करावेत, या मागणीसाठी पनवेल महापालिका मुख्यालयासमोर दिव्यांगांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधव शहरातील विविध भागांत दुकाने थाटून उपजीविका करीत आहेत. महापालिकेच्या कारवाईमुळे उपजीविकेचे साधन नष्ट होत असल्याने त्यांनी मंगळवारी पनवेल महापालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर शहरात विविध ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या अपंगांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन पनवेल नगरपालिकेने कधीही कारवाई न केल्याने आताच ही कारवाई का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील सात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. टेलिफोन बूथ काळाच्या ओघात बंद पडल्यामुळे या अपंगांनी स्टॉलवर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले होते. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या काळात पुनर्वसनासाठी दिव्यांग व्यावसायिकांचा सर्व्हेदेखील करण्यात आला होता. महापालिकेकडे वारंवार आंदोलन करूनही दखल घेतली गेली नाही. म्हणून दिव्यांगांनी एकत्र येत कोणत्याही संघटनेशिवाय महापालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले. आयुक्तांनी दिलेले आश्वासन पाळावे, असे फलक गळ्यात अडकवून हे आंदोलन दिव्यांगांनी सुरू केले.