एटीएम बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:50 PM2019-01-18T23:50:18+5:302019-01-18T23:50:29+5:30
बँकांमध्ये गर्दी : आर्थिक व्यवहार खोळंबल्याने अनेकांची अडचण
- मयूर तांबडे
पनवेल : सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे जुने एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. १५ दिवस उलटूनही नवीन कार्ड उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत.
सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे जुने एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ नंतर बंद होतील, अशा सूचना ग्राहकांना सर्व बँकांनी दिल्या होत्या. तसे सूचना संदेशही बँकांकडून पाठवण्यात आले होते. त्यामुळे बँकांकडून नवीन एटीएम त्वरित उपलब्ध होणे अपेक्षित होते.
रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार, जुने तंत्रज्ञान असलेले एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी ब्लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो ग्राहकांची गैरसोय झाली असून, मॅग्नेटिक चीप असलेले नवीन एटीएम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. मात्र, नवीन एटीएम कार्ड पुरेशा संख्येने उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत.
बँक आॅफ इंडियाच्या ज्या खातेदारांचे नवीन डेबिट कार्ड आले आहेत, त्यांची नोंद रजिस्टरमध्ये केली जात आहे. मात्र, डेबिट कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या खातेदाराला नाव शोधण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढत आहे. अनेक ग्राहकांना आपली महत्त्वाची कामे सोडून बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये नाव शोधावे लागत आहे. ज्यांना नवीन डेबिट कार्ड मिळाले नाही, त्यांचे आर्थिक व्यवहार एटीएमअभावी अडचणीत आले आहेत.
पनवेल तालुक्यात ग्रामीण भाग मोठा आहे. येथील अनेक ग्राहकांना जुने एटीएम बंद होणार असल्याचे माहीतच नव्हते. काही बँका नवीन एटीएम देण्यासाठी खातेदारांकडून नव्याने अर्ज भरून घेत आहेत. बँकांनी ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र, अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाहीत त्यामुळे संबंधित बँकेच्या
एटीएमधारक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.