कळंबोली : पनवेल-कळंबोली वसाहतीत अगोदरच रस्त्याची स्थिती चांगली नाही, त्यातच महानगर गॅसने जोडणीकरिता रस्ते खोदले आहेत आणि ते पूर्ववत न केल्यामुळे दुरवस्था झालेली आहे, त्यामुळे रहिवाशांना याचा त्रास होत आहे. धूळही उडत असल्याच्या तक्रारी येत आहेत, याकडे सिडकोचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये सोयी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक समस्यांकडे सिडकोने महानगरपालिका आल्यानंतर दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे कळंबोलीकरांना खूपच गैरसोयी सहन कराव्या लागत आहेत. शहरातील रस्त्याची स्थिती बिकट आहे. सिडकोकडून डागडुजी करण्यात आलेली नाही. याअगोदर पाण्याच्या वाहिनी तसेच मोबाइल कंपन्यांच्या वायर टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. त्याकरिता सिडकोने डॅमेज शुल्कही घेतले.
मात्र, आजपर्यंत त्या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्यात आलेली नाही. रोडपालीतील सेक्टर ८ आणि ९ ई परिसरात महानगर गॅस कंपनीने गॅसची जोडणी करण्यासाठी वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात रस्ते खोदले गेले आहेत. मध्यभागी खड्डे पाडले आहेत, त्यामुळे त्रास होत आहे. तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे. काम झाल्यानंतर त्या ठिकाणी मातीही व्यवस्थित टाकण्यात आलेली नाही. यामुळे धूळ उडत आहे, तसेच रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. सिडकोनेही डोळेझाक केल्याने यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.