नवी मुंबई : हार्बर मार्गावरील सर्वात हायटेक रेल्वे स्टेशन असलेल्या सीवूडमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्लॅटफॉर्मवरील खिळे व तुटलेल्या फरशीमुळे शुक्रवारी दिव्यांग प्रवासी कोसळून किरकोळ अपघात झाला. याविषयी रेल्वे व पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सीवूड रेल्वे स्टेशनच्या जागेवर बहुमजली व्यावसायिक इमारत उभी करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक रेल्वे स्थानक उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात प्रवाशांच्या विशेषत: दिव्यांग प्रवाशांच्या समस्या वाढत आहेत. सीवूड सेक्टर ४२ मध्ये राहणारे सोमनाथ चौघुले शुक्रवारी सीवूड स्टेशनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाण्यासाठी कुटुंबासह स्टेशनमध्ये आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील जाड खिळ्यांमुळे अडखळून ते पडले. सुदैवाने त्यांना फारशी दुखापत झाली नाही. रेल्वे व सिडको प्रशासनाच्या निष्काळजीमुळे हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी अनेक फरशा तुटल्या आहेत, त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीवूड स्टेशनमध्ये शुक्रवारी दिव्यांग प्रवासी पडल्यामुळे गैरसोयींचा विषय ऐरणीवर आला आहे. अशाप्रकारचे अपघात पुन्हा होण्याची शक्यता आहे. रेल्वे व सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सोमनाथ चौघुले यांनी पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली आहे. निष्काळजीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रेल्वे व सिडकोविरोधात अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.सीवूड रेल्वे स्टेशनमधील खिळ्यांमध्ये अडखळून पडलो. सुदैवाने फारशी दुखापत झाली नाही. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तत्काळ दुरुस्तीचे काम करण्यात यावे व दोषींवर अपंग व्यक्ती अधिकारी अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. - सोमनाथ चौघुले, रहिवासी, सीवूड सेक्टर ४२