नवीन सीवूड स्टेशनमध्ये अपंगांची गैरसोय
By Admin | Published: February 5, 2016 02:59 AM2016-02-05T02:59:01+5:302016-02-05T02:59:01+5:30
हार्बर मार्गावरील बांधकाम रखडलेल्या सीवूड स्टेशनमधील पनवेलकडे जाणारी मार्गिका सुरू केली आहे. सीएसटीकडे जाणारा मार्गही लवकरच खुला होणार आहे.
नवी मुंबई : हार्बर मार्गावरील बांधकाम रखडलेल्या सीवूड स्टेशनमधील पनवेलकडे जाणारी मार्गिका सुरू केली आहे. सीएसटीकडे जाणारा मार्गही लवकरच खुला होणार आहे. देशातील सर्वात भव्य स्टेशन म्हणून चर्चा असलेल्या सीवूडमध्ये अपंगांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मार्गिकाच नाही.
नवी मुंबईमधील सीवूड रेल्वे स्टेशन हे सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. जुने रेल्वे स्थानक बांधल्यानंतरही प्रत्यक्षात याठिकाणी रेल्वे थांबतच नसल्याने नागरिकांना आंदोलन करावे लागले होते. स्टेशन व बाजूला भव्य आयटी पार्क उभारण्याचे काम एल अँड टी कडे सोपविण्यात आले होते. वास्तविक एक वर्षापूर्वीच नवीन रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु ते वेळेत पूर्ण होवू शकले नाही. जवळपास चार वर्षांपासून सीवूड व दारावे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. नवीन स्थानकामधील पनवेलकडे जाणारी मार्गिका ३१ जानेवारीला खुली करण्यात आली. सीएसटीकडे जाणारी मार्गिका ७ फेब्रुवारीला खुली होण्याची शक्यता आहे.
जुन्या रेल्वे स्टेशनमध्ये अपंग नागरिकांना व्हिलचेअरवर बसूनही स्थानकामध्ये जाता येईल अशी सुविधा होती. वृद्ध नागरिकांनाही त्याचा फायदा होत होता. परंतु नवीन स्थानकामध्ये अपंगांसाठीची मार्गिकाच नाही. ज्यांना चालता येत नाही त्यांनी ३६ पायऱ्या कशा ओलांडायच्या असा प्रश्न अपंग नागरिक विचारू लागले आहेत. अनेक अपंग नागरिकांना गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे पायऱ्या चढता येत नाहीत. त्यांनी स्टेशनमध्ये कसे जायचे असा प्रश्न अपंग उत्कर्ष सेवा संस्थेचे सचिव सोमनाथ चौघुले यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)