कळंबोली : पनवेल रेल्वे स्थानकातील दोन प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता पावसाचे दिवस असल्याने हाल होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा फटका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. अभियांत्रिकी विभागाने त्वरित छत टाकून प्रवाशांचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करावे अशी मागणी जोर धरत आहे.
पनवेल रेल्वे स्थानकातून उपनगरीय लोकल सेवा तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. कोकण, पणजी, पुणे, नांदेड, बिदर येथे जाण्याकरिता पनवेल स्थानकात प्रवासी येतात. पनवेल रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी रेल्वे गाडीने प्रवास करतात. असे असताना या ठिकाणी सोयी-सुविधांचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. सार्वजनिक स्वच्छतागृहांपासून इतर अनेक समस्यांचे पनवेल रेल्वे स्थानकाला ग्रहण लागले आहे. एकीकडे भविष्यात आशिया खंडातील सर्वात मोठे जंक्शन म्हणून याकडे पाहिले जात आहे आणि दुसरीकडे प्लॅटफॉर्मला छत नसल्याने प्रवाशांना भिजावे लागत आहे. ६ व ७ या क्र मांकांच्या रेल्वे फलाटांची ही स्थिती आहे. गेल्या काही महिन्यापासून ही स्थिती आहे.
उन्हाळ्यातही प्रवाशांना उन्हाचे चटके बसत होते. याबाबत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या प्रतिभा सावंत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचा शब्द सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आला होता. परंतु त्यांनी तो पाळला नसल्याचे उघड्या प्लॅटफॉर्मवरून दिसून येत आहे. खरे पाहिले तर पावसाळ्यापूर्वीची छत देखभाल दुरु स्तीची कामे पूर्ण करणे गरजेचे होते, परंतु ते करण्यात आले नाही. त्यामुळे त्याठिकाणी निवाºयाची सोय नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी प्रवाशांना भिजत थांबावे लागत आहे.
गाड्यांची वाट पाहात संपूर्ण उन्हाळा उघड्या छताखाली प्रवाशांनी डोक्यावर घेतला. आता मात्र प्रवाशांना भिजल्याशिवाय पर्याय नाही . त्याचबरोबर इतर प्लॅटफॉर्मचीही परिस्थिती फारशी चांगली नाही.अनेकदा जोराचा पाऊस आल्याने सामान भिजत असल्याच्या तक्र ारी प्रवासी करीत आहेत, परंतु याचे रेल्वे प्रशासनाला काहीच देणे घेणे नाही. प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याची प्रतिक्रि या संतोष जाधव या प्रवाशाने लोकमतला दिली.
पावसाळी दिवसाअगोदर छताचे काम पूर्ण झाले नाही. याबाबत आमचा अभियांत्रिकी विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण करून घेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.- एस.एन. नायर,स्टेशन मास्तर