मैदानात गवत वाढल्याने खेळाडूंची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:17 AM2019-11-16T00:17:25+5:302019-11-16T00:17:31+5:30
कळंबोली वसाहतीतील सेक्टर १ मधील भूखंड क्रमांक २८ येथे एकमेव खेळाचे मैदान आहे.
कळंबोली : कळंबोली वसाहतीतील सेक्टर १ मधील भूखंड क्रमांक २८ येथे एकमेव खेळाचे मैदान आहे. त्या ठिकाणी सध्या गवत आणि झाडेझुडपे वाढल्याने खेळण्यासाठी येणाऱ्यांची तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. मैदानाची साफसफाई करून ते खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कळंबोली वसाहत ही जुनी आणि लोकसंख्येच्या तुलनेत मोठी वसाहत आहे. या ठिकाणी सिडकोने मैदानासाठी एकही भूखंड ठेवलेला नाही. सेक्टर १ येथे एकमेव भूखंड रिकामा असून या ठिकाणी मुले क्रिकेटसह इतर खेळ खेळतात. केएलई कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या या मैदानात पावसाळा वगळता इतर वेळी क्रिकेटचे सामने खेळले जातात. तसेच स्थानिक खेळाडू येथे सकाळ आणि संध्याकाळी सराव करतात. सिडकोने या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकसुद्धा बनवला आहे; परंतु मैदानात मोठ्या प्रमाणात गवत-झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे सरावासाठी येणाºया मुलांची गैरसोय होते आहे.
सरपटणाºया प्राण्यांचा धोका बळावला आहे. मध्यंतरी कामोठेत सर्पदंशाने एका तरुणीचा मृत्यू झाला होता. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे गवत आणि झाडेझुडपे धोकादायक आहेत. सकाळी आणि संध्याकाळी रहिवाशांनाही येथे वॉकिंग करण्याकरिता अडचणी येत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून सिडकोने त्वरित क्रिकेट ग्राउंडवरील गवत आणि झुडपे काढून साफसफाई करावी, अशी मागणी नगरसेवक रामदास शेवाळे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
>गवतामुळे विंचू, साप यांचा वावर
सेक्टर १ मध्ये वसाहतीच्या बाजूलाच हे मैदान आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली आहेत. यामुळे साप, विंचू यांचा वावर वाढला आहे. यांचा लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिक यांना धोका निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु या आसन व्यवस्थेलाच गवताने वेढा घातला आहे.
>क्रिकेट मैदानावर गवताचे प्रमाणात वाढलेले आहे. पावसामुळे भूखंडाची साफसफाई करण्यात आली नव्हती. लवकरच पाहणी करून गवताची कापणी केली जाईल. त्यामुळे कळंबोलीकरांना त्रास होणार नाही, याची दखल घेतली जाईल.
- सीताराम रोकडे, अधीक्षक अभियंता, सिडको, कळंबोली