रायगड किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय; जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे छप्पर उडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:07 AM2018-11-23T00:07:46+5:302018-11-23T00:08:29+5:30

दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कि ल्ल्यावरील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे छप्पर पावसाळ्यात उडाले आहे.

Disadvantages of tourists on Raigad fort; The without roof of the Zilla Parishad's hostel | रायगड किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय; जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे छप्पर उडाले

रायगड किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय; जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे छप्पर उडाले

- नामदेव मोेरे

नवी मुंबई : दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कि ल्ल्यावरील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे छप्पर पावसाळ्यात उडाले आहे. धर्मशाळेचीही दुरवस्था झाली आहे. प्रसाधनगृहांची संख्या अपुरी असून त्यांची स्वच्छता करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
रायगड किल्ल्याविषयी राज्यासह, देश-विदेशातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड आस्था आहे. मराठा साम्राज्याची राजधानी व छत्रपती शिवाजी महाराजांची समधी गडावर असल्यामुळे प्रतिदिन हजारो शिवप्रेमी गडावर येत असतात. ५० ते १०० वेळा गडाला भेट देणारेही अनेक शिवभक्त आहेत.
दिवाळीची सुट्टी असल्यामुळे रोज चार ते पाच हजार पर्यटक गडावर येत आहेत. रात्री मुक्काला येणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रोपवे एवढेच पर्यटक पायरी मार्गाने येऊ लागले आहेत. गडावर पर्यटकांची गैरसोय होऊ लागली असून, त्याकडे पुरातत्त्व विभागासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पर्यटकांच्या सुविधेसाठी एमटीडीसी व रोपवे कंपनीने निवासाची सोय केली आहे; परंतु ती व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. जिल्हा परिषदेनेही विश्रामगृह बांधले आहे; पण जुलैमध्ये मुसळधार पावसामध्ये विश्रामगृहावरील छप्पर उडाल्यामुळे त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही.
जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाला लागून आश्रमशाळा आहे. येथे जवळपास १०० पर्यटकांना रात्री मुक्काम करता येतो; परंतु त्याचीही योग्य देखभाल केली जात नाही. आश्रमशाळेच्या छतावरील दोन पत्रे उडाले आहेत. भिंत म्हणून उभारलेले पत्रे गंजले आहेत. त्यामुळे सुविधा असूनही योग्य देखभाल-दुरुस्ती नसल्याने त्यांचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. आश्रमशाळेचीही देखभाल व दुरुस्तीसाठी अद्याप काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे गडावर जागा मिळेल तेथे पर्यटक रात्री मुक्काम करत आहेत. येथील मूळ निवासी असलेल्या नागरिकांच्या झोपड्यांचाही आधार घेतला जात आहे.

गडावर सद्यस्थितीमध्ये हजारो पर्यटक रोज येत आहेत; परंतु त्यांच्यासाठी फक्त दोनच ठिकाणी प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. यामधील आश्रमशाळेला लागून असलेल्या प्रसाधनगृहाची साफसफाई केली जात नाही. प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. येथून जाताना नाक मुठीत घेऊन जावे लागत आहे.

दुसरे प्रसाधनगृह बाजारपेठेच्या बाजूला असून ते रात्री ८ नंतर बंद केले जाते. त्यामुळे रात्री मुक्कामाला असलेल्या पर्यटकांना त्याचा वापर करता येत नाही. प्रसाधनगृहांची अपुरी संख्या व जे आहेत त्यांची साफसफाई होत नसल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

गडावर उघड्यावर शौचास जावे लागत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. शासनाने रायगड विकासाचा ६०६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे; परंतु सर्वप्रथम पर्यटकांसाठी निवासव्यवस्था व प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

पर्यटकांकडून पर्यावरणाची हानी
रायगड किल्ल्यावर जाणारे शिवभक्त येथील कोणत्याही वास्तूला किंवा निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतात; परंतु हौशी पर्यटक पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करत आहेत. पाणी पिण्यासाठी वापरल्या जाणाºया प्लॅस्टिकच्या बाटल्या गडावरच फेकून दिल्या जात आहेत. वेफर्स व इतर खाद्यपदार्थांच्या पिशव्याही सर्वत्र फेकल्या जात आहेत. शिवप्रेमी कचरा उचलण्याचे काम करतात; पण सर्व पर्यटकांनी नियमांचे पालन केले तर गडावर अस्वच्छता होणार नाही व निसर्गाचीही हानी होणार नाही, असे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.

मुसळधार पावसात विश्रामगृहाचे छप्पर उडाले
जिल्हा परिषदेने रायगड किल्ल्यावर विश्रामगृह बांधले आहे; पण जुलैमध्ये मुसळधार पावसामध्ये विश्रामगृहावरील छप्पर उडाल्यामुळे त्याचा वापर बंद आहे. अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही.

जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे पत्रे पावसाळ्यात उडाले आहेत. दुरुस्तीसाठी हे विश्रामगृह रायगड संवर्धनासाठी तयार केलेल्या विशेष समितीकडे हस्तांतर केले आहे. समितीकडून दुरुस्तीसाठीची कार्यवाही केली जाणार आहे.
- अभय यावलकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड

रायगड किल्ला हा सर्वांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. येथे येणाºया शिवभक्त व पर्यटकांसाठी विश्रामगृह व धर्मशाळेची दुरुस्ती करण्यात यावी. प्रसाधनगृहांची दुरुस्ती केली जावी व स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी.
- गणेश माने, शिवभक्त,
नवी मुंबई

Web Title: Disadvantages of tourists on Raigad fort; The without roof of the Zilla Parishad's hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड