‘त्या’ चालकाविरोधात असंतोष; परिवहनचे पोलिसांना पत्र, जीवे ठार मारल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:53 AM2017-10-08T03:53:36+5:302017-10-08T03:53:46+5:30
एनएमएमटी बस चालकास धमकी देऊन ट्रकने बसला धडक दिल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून दोषी ट्रक चालकाविरोधात जीवे ठार मारण्याची धमकी
नवी मुंबई : एनएमएमटी बस चालकास धमकी देऊन ट्रकने बसला धडक दिल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून दोषी ट्रक चालकाविरोधात जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे.
सायन-पनवेल महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. ट्रक (एमएच ०४ जीए २८६८)वरील चालकाने तुर्भे नाक्यावर एनएमएमटी बस चालकाशी वाद घातला. पुलावर चालू बसला एक वेळ धडक दिली. बस ‘लोकमत’ कार्यालयासमोरील बसस्टॉपवर उभी राहिल्यानंतर ट्रकचालकाने पुन्हा बसचालकास धमकावले व ट्रक रिव्हर्स घेऊन प्रवासी बसलेल्या बसला धडक दिली. या घटनेविषयी वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरामध्ये खळबळ उडाली आहे. एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एनएमएमटीच्या अधिकाºयांनी उपआयुक्तांसह सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची भेट घेऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. परिवहन व्यवस्थापनाने दिलेल्या पत्राच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद शहरामध्येही उमटले आहेत. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने काढलेला व्हिडीओ सोशल मीडियातून शहरभर पसरला. ट्रकचालकाच्या वर्तनाचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.
व्यवस्थापनाची कडक भूमिका
ट्रकचालकाच्या गुंडगिरीची गंभीर दखल परिवहन व्यवस्थापनाने घेतली आहे. परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी स्वत: परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधला व कारवाईची मागणी केली. उपआयुक्तांना लेखी पत्रही दिले असून त्या पत्राच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
डंपरची एनएमएमटीला धडक
सानपाडामधील घटनेनंतर शनिवारी वाशी-बामनडोंगरी मार्गावर मोरावेजवळ डंपरने एनएमएमटीला धडक दिली. एमएच ४३ एआर ८११७ वरील डंपरने दिलेल्या धडकेमध्ये बसचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.