घणसोलीत महापालिकेच्या कारवाईविरोधात असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:41 AM2018-05-31T01:41:15+5:302018-05-31T01:41:15+5:30
नव्याने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु कारवाई करताना अनेकदा नियमांना बगल दिली जात
नवी मुंबई : नव्याने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु कारवाई करताना अनेकदा नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहिवाशांत महापालिकेच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे. नोसिल नाक्यावर बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईवर येथील बांधकामधारकांनी तीव्र आक्षेप घेत महापालिकेच्या मनमानीचा निषेध केला आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने अनेक जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नोसिल नाक्यावर असलेल्या बैठ्या चाळीत मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या दुरुस्तीची कामे मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता घणसोली विभाग कार्यालयाने बुधवारी येथील चाळीवर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात रहिवाशांनी जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत रहिवाशांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा असंतोष पसरला आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार विभाग कार्यालयामार्फत आपापल्या विभागातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. असे असले तरी गाव-गावठाणात सुरू असलेल्या तीन ते चार
मजल्याच्या बांधकामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायतीच्या काळातील बैठ्या चाळीवर
कारवाई करून महापालिकेला काय सिध्द करायचे आहे, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.