लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जीएसटीमधील अटींमुळे शहरातील अनेक व्यावसायिकांनी त्यांच्याकडील असलेला साठा विक्रीला काढला आहे. याकरिता ग्राहकांना डिस्काउंट आॅफरचे आमिष दाखवले जात आहे. यामुळे कपडे व विद्युत उपकरणांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.१ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीमुळे करचुकवेगिरी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. यापुढील त्यांच्या प्रत्येक व्यवहारावर शासनाची नजर राहणार असल्याने त्याकरिता नियमही सक्त करण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम कपडे व विद्युत उपकरणे व्यावसायिकांवर होणार आहे. यापूर्वी कोणत्याही कपड्याच्या मालावर व्हॅट किंवा एक्साइज लागू नव्हता. मात्र, जीएसटी अंतर्गत कपड्यावर ५ टक्के जीएसटी, तर रेडिमेड कपड्यावर एक हजार रुपयांवरील खरेदीवर १२ टक्के जीएसटी लागणार आहे. त्याखालील रकमेवर ५ टक्के जीएसटी दर लागणार आहे. जीएसटीमध्ये दुकानदारांनी यापूर्वी केलेल्या मालाच्या साठ्यावरही परिणाम होणार आहे. प्रत्येक करदात्याला ३० जूनपर्यंतच्या साठ्याची माहिती देणे बंधनकारक आहे. टॅक्स फ्री किंवा रिल सेलचा स्टॉक असल्यास त्याचीही माहिती द्यावी लागणार आहे. तर एका वर्षावरील जुन्या साठ्याचे क्रेडिट जीएसटीमध्ये मिळणार नसल्याने असा साठा विकावा लागणार आहे. यामुळे अनेक कपडे व्यावसायिकांनी त्यांच्याकडील जुना साठा कमी किमतीत विक्रीला काढला आहे. हे चित्र शहरातील सर्वच महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये दिसत आहे.अनेक दुकानदारांनी २० ते ६० टक्केच्या डिस्काउंट आॅफर घोषित करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हा स्टॉक संपवण्यासाठी दुकानदारांकडे ३० जूनपर्यंची मुदत आहे. यामुळे पुढील दहा ते बारा दिवस या आॅफर सुरू राहणार असल्याने ग्राहकांची चांगलीच चांदी होणार आहे. जीएसटीमुळे खरेदीदारांच्याही खिशाला कात्री बसणार आहे. यामुळे नेहमी खरेदीला पसंती देणाऱ्यांनीही या डिस्काउंट आॅफरचा पुरेपूर फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ब्रँडेड शोरूमसह सामान्य दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
जीएसटीमुळे ग्राहकांसाठी डिस्काउंटचा धमाका
By admin | Published: June 19, 2017 5:09 AM