कासाडीला प्रदूषणाला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:45 AM2018-08-07T02:45:44+5:302018-08-07T02:45:49+5:30
प्रदूषणकारी कारखान्यांमुळे तळोजा येथील कासाडी नदीला धोका निर्माण झाला आहे.
- शैलेश चव्हाण
तळोजा : प्रदूषणकारी कारखान्यांमुळे तळोजा येथील कासाडी नदीला धोका निर्माण झाला आहे. नदीच्या पात्रात कारखान्यातील रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने संपूर्ण नदीला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. याचा फटका परिसरातील मच्छीमारांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारीची राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी गंभीर दखल घेतली असून नदीचे पात्र प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
तळोजा येथील कासाडी नदीची प्रदूषणामुळे पूर्णत: नासाडी झाली आहे. तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. पाण्याला काळा, निळा, लाल, हिरवा असे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या नदीच्या पात्रात मासेमारी करणाºया स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात नदीचे पाणी आणखी गडद होते. नदीच्या पात्रात सोडल्या जाणाºया दूषित पाण्यामुळे मासे व इतर जलजीवांना धोका निर्माण झाला आहे. मासे मृत पावण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. शिवाय या नदीत आढळणारे खेकडा, कटले, चिवणी, लहान कोळंबी, जिताडा या माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडून पश्चिमेस कासाडी नदी वाहते. हाजीमलंग डोंगराच्या पायथ्यापासून स्वच्छ व पारदर्शक असा निर्मळ पाण्याचा प्रवाह या नदीतून वाहतो. परंतु नदीचा प्रवाह तळोजा औद्योगिक वसाहतीच्या जवळ येताच पाण्याचा रंग बदलतो. ही बाब स्थानिकांनी संबंधित प्रशासनाच्या अनेकदा निदर्शनास आणून दिली आहे. परंतु आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले आहे. मात्र आता खुद्द पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनीच या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
>अर्थपूर्ण चुप्पी
पडघे गाव येथून पश्चिमेकडे वाहणाºया कासाडी नदीच्या काठावर औद्योगिक कारखाने वसले आहेत. तसेच तळोजा जलशुद्धी प्रकल्पही याच भागात आहे. कारखान्यातून सोडल्या जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया होते की, नाही हे तपासणे एमआयडीसी आणि प्रदूषण महामंडळाचे काम आहे. परंतु या दोन्ही यंत्रणांनी अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने कासाडी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
>कासाडी नदीत छुप्या पद्धतीने दूषित पाणी सोडणाºया कारखान्यांची गय केली जाणार नाही. स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींनी अशा कारखान्यांची नावे दिल्यास संबंधित कारखान्यांवर नियमाने कारवाई केली जाईल. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यात लक्ष घालीत नसतील, तर त्यांनाही समज दिली जाईल.
- प्रवीण पोटे,
राज्यमंत्री, पर्यावरण
>कासाडी नदीच्या पात्रात दिवसाढवळ्या रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीतील मासे व इतर जलजीवांना धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- योगेश पगडे,
मच्छीमार, रोडपाली