सर्वसाधारण सभेत ४३ विषयांवर चर्चा

By Admin | Published: August 30, 2015 11:50 PM2015-08-30T23:50:51+5:302015-08-30T23:50:51+5:30

नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे

Discussion on 43 topics in general meeting | सर्वसाधारण सभेत ४३ विषयांवर चर्चा

सर्वसाधारण सभेत ४३ विषयांवर चर्चा

googlenewsNext

पनवेल : नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ४३ विषयांवर चर्चा करण्यात आली.
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करणे, शहरात एनएमएमटी बससेवा सुरु करणे, राष्ट्रपुरुषांच्या नावाने महत्त्वाच्या रस्त्यांना नावे देणे आदी महत्त्वाच्या विषयांवर शुक्रवारी झालेल्या सभेत चर्चा करण्यात आली.
नगरपरिषदेवर काही दिवसांपूर्वी कफ सह एकूण ५० संस्थांनी मोर्चा काढत नगरपरिषदेच्या कामकाजाचा निषेध केला होता . याचे पडसाद याठिकाणी उमटल्याचे पहावयास मिळाले. शहरात नगरपरिषदेची परिवहन सेवा सुरु करण्यात येईल असे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप ही सेवा सुरु झाली नाही. शहरातील नागरिकांना परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कफ या संस्थेने शहरात नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट कंपनीस परिषदेमार्फत नाहरकत दाखला देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत नगरपरिषद काही अटीवर नवी मुंबई महापालिका परिवहनची बस सेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याचे समजते. मात्र या वेळी विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी बससेवा सुरु करायची असेल तर त्यांच्यावर अटी किंवा बंधने घालू नयेत अशी सूचना केली आहे. सध्या पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याचा विषय गाजत असताना नगरपरिषदेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत खारघर, कळंबोली आदी शहरातील नागरिकांनी पनवेल महानगरपालिके मध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविला आहे. अशा वेळी पनवेल नगरपरिषद जवळच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची मदत घेण्याचा विचार करत असेल तर पनवेल नगरपरिषदेच्या दृष्टीने नकारात्मक वातावरण करणारे आहे. पीएमटी या बससेवेची घोषणा करुन ती रस्त्यांवर कधी धावणार असा प्रश्न सध्या पनवेलकरांना पडला आहे. शहरातील रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. पनवेल नगरपरिषद शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगरपरिषदेमार्फत कचरा वेचक यांचा सर्व्हे करुन नोंद घेणे त्याकरिता खाजगी संस्थेची नियुक्ती करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्काशित व नियमित करणे आदींवर चर्चा झाली. याअंतर्गत शहरातील सात मंदिरे नियमित करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. कचऱ्याच्या प्रश्नावरुन नगरसेवक लतीफ शेख यांनी नगरपरिषदेचे वाभाडे काढले. एकही योजना यशस्वी होत नाही केवळ कागदोपत्री चर्चा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरपरिषद हद्दीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला मंजुरी दिली. शहरातील अनधिकृत हातगाड्या चालवणाऱ्यांकडून काही जण हप्ते वसुली करत असल्याचा आरोप नगरसेविका निर्मला म्हात्रे यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion on 43 topics in general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.