भाजप-शेकापमध्ये लढतीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:13 PM2019-08-28T23:13:22+5:302019-08-28T23:14:04+5:30

पनवेल विधानसभा मतदारसंघ : राजकीय हालचालींना वेग

Discussion of the fight in BJP-Shekap | भाजप-शेकापमध्ये लढतीची चर्चा

भाजप-शेकापमध्ये लढतीची चर्चा

Next

वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू आहे. शहरीकरणामुळे या मतदारसंघाचा मोठा विस्तार झाला. एकेकाळी शेकापचे मातब्बर नेते असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकापला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकूरांच्या रूपाने पनवेलमध्ये शेकापला राजकीय विरोधक निर्माण झाला. २००९ साली रामशेठ ठाकूर यांनी पुत्र प्रशांत ठाकूर यांना काँग्रेसमधून विजयी केले. त्या पाठोपाठ २०१४ साली काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमधून दुसऱ्यांदा विधानसभेत विराजमान झाले.


या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना तब्बल ५४ हजारांची आघाडी या मतदारसंघातून मिळाली. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली होती. लोकसभा निवडणूक विधानसभेची सेमी फायनल मानली जात होती. त्याअनुषंगाने युतीचे या मतदारसंघात पारडे जड असल्याचे पाहावयास मिळत आहे. पनवेल महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, तर पंचायत समितीत शेकापची सत्ता आहे, यामुळे शहरी भागात भाजपला पसंती आहे तर ग्रामीण भागात अद्यापही शेकापचे अस्तित्व कायम आहे. लोकसभा निवडणुकीत सेनेला मिळालेले यश पाहता शिवसेनेची पक्षबांधणीही पनवेलमध्ये घट्ट होत आहे.

विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती झाल्यास भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र, युतीचे गणित फिस्कटल्यास पनवेलमध्ये भाजप, शेकाप व शिवसेना अशी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. भाजपने प्रशांत ठाकूर यांना पक्षात चांगले स्थान दिले आहे. रायगड जिल्हाध्यक्ष, त्यानंतर सिडको महामंडळ अध्यक्ष पदावर ठाकूर सध्या कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, लक्ष्यवेधी यावरून दिसून येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील पायाभूत समस्या, मतदारसंघातील पाण्याचा मुख्य प्रश्न लक्षात घेता विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात.


पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे शेकापचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाजपशी दोन हात करण्याच्या दृष्टीने काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसेही शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे. सध्याच्या घडीला पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. एक लाख मताधिक्याचा निर्धार आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केला आहे. तशा स्वरूपाचे फलकदेखील पनवेलमध्ये विविध ठिकाणी झळकत आहेत.


भाजप वगळता अद्याप इतर दुसºया कोणत्याही पक्षांनी आपला संभाव्य उमेदवार जाहीर केलेला नाही, त्यामुळे निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना भाजप वगळता एकही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केला नसल्याने भाजपला अद्याप मतदारांपर्यंत पनवेलमधील विधानसभेचा उमेदवार कोण असणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शिरीष घरत देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. युती न झाल्यास त्यांच्या नावाचा विचार मातोश्रीवरून होऊ शकतो. मागील अनेक वर्षांपासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याने घरत यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. पनवेलमधून अपक्ष म्हणून कांतिलाल कडू हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यांनी काँग्रेसमधून इच्छुक उमेदवार म्हणून अर्जदेखील केला आहे. मात्र, भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस शेकापसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्याने कडू हे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीची आकडेवारी
२०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रशांत ठाकूर यांना एक लाख २५ हजार १४२ मते मिळाली होती. शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना एक लाख ११ हजार ९२७ एवढी मते मिळाली होती. तिसºया क्रमांकावर सेनेचे वासुदेव पाटील हे होते त्यांना १७ हजार ९५३ एवढी मिळाली होती. तर २६६६ जणांनी नोटाला पसंती दिली होती. या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना १३ हजार २१५ एवढे मताधिक्य मिळाले होते. मात्र, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सेनेला मिळालेले ५४ हजारांचे मताधिक्य पाहता विरोधी पक्षात चिंतेचे वातावरण आहे.

युतीवर राजकीय गणिते अवलंबून
राज्यात सध्याच्या घडीला सेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. यामुळे जागावाटपात दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. सेना-भाजपने वेगवेगळ्या चुली मांडल्यास पनवेल मतदारसंघात शेकाप, भाजप, सेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवारही निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

Web Title: Discussion of the fight in BJP-Shekap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.