पनवेल : महाराष्ट्र महापौर परिषद या संस्थेच्या वतीने दर तीन महिन्यांनी महापौर परिषद आयोजित करण्यात येते. त्यात महापौरांच्या समस्येवर, विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येते. पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या पुढाकाराने शनिवार, २५ आॅगस्ट रोजी महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील दोन दिवसांत राज्यातील सर्व महापौर परिषदेच्या निमित्ताने पनवेलमध्ये येणार आहेत. पनवेल तालुक्यातील उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे एक दिवशीय परिषद होणार आहे. महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर हे असून महाराष्ट्रातील सर्व महापालिकांच्या महापौरांना परिषदेचे निमंत्रण देण्यात आल्याची महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी माहिती दिली. परिषदेत ८ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या निर्णयाप्रमाणे परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीचे अधिकारी अध्यक्ष कार्याध्यक्षांना दिले होते. महाराष्ट्र महापौर परिषद व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या महापौरांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्याबाबत, गोवा येथे झालेल्या परिषदेच्या खर्चास मंजुरी मिळण्याबाबत अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण व मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काढलेल्या पत्रकात याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.