नवी मुंबई : नेरुळ येथील मनपा आयुक्त निवासस्थानातून टीव्ही, फ्रीजसह इतर जुने साहित्य गहाळ झाल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे. युद्धपातळीवर बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली असून, नवीन साहित्य बसविण्यात आले आहे. साहित्य गहाळ झाल्याची कोणतीही तक्रार दाखल नसून, प्रशासनाने असे काही घडलेच नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांसाठी नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संत गाडगेबाबा उद्यानाच्या पायथ्याशी बंगला बांधण्यात आला आहे. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर हे अद्याप या निवासस्थानामध्ये राहण्यासाठी आलेले नाहीत. मागील काही दिवसांमध्ये या निवासस्थानातून जुने टीव्ही, फ्रीज, पडदे व इतर साहित्य गहाळ झाले आहे. मनपा प्रशासनाने गेल्या आठवड्यात युद्धपातळीवर बंगल्याची रंगरंगोटी केली असून, नवीन साहित्य बसविले आहे. पण, खरोघर साहित्य गहाळ झाले का, याविषयी प्रशासनाने ठोस दुजोरा दिलेला नाही. आयुक्त बंगल्यातील साहित्य गहाळ झाल्याविषयी सुरू असलेल्या चर्चेविषयी परिमंडळ एकचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला असता, असे काहीही घडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे साहित्य गहाळ झाले की, कोणी याविषयी अफवा उठविली, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.
अनेक प्रश्न उपस्थितखरे तर नवीन साहित्य बसविले असल्यास जुन्या साहित्याचे काय झाले, ते कोणाला दिले, कोणी नेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. साहित्य गहाळ झाले असल्यास, त्याविषयी तक्रार दाखल होणेही आवश्यक आहे.