भाजपच्या बैठकीमध्येही नाईकांच्या प्रवेशाची चर्चा; कार्यकर्त्यांकडून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:58 PM2019-07-23T23:58:33+5:302019-07-23T23:58:52+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मुंबईमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली. दरम्यान, नवी मुंबईमधील काही पदाधिकाऱ्यांनी नाईकांच्या प्रवेशास विरोध दर्शविला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु यानंतरही नाईक परिवार भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख पदाधिकाºयांनीही या वृत्ताचे खंडन केल्यानंतरही चर्चा सुरूच आहे. नाईक एका बड्या उद्योजकाच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांना प्रवेशाविषयी सांगितले जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात नाईकांच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क लढविले जात आहे.
मंगळवारी भाजपच्या मुंबईमध्ये झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली. याविषयी पदाधिकाºयांना विचारणा केली असता १० ते १५ जणांनी नाईकांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला. आतापर्यंत कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाची माहितीही या वेळी देण्यात आली.
भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत व इतर पदाधिकाºयांनी नाईकांना विरोध करण्यासाठी प्रदेश कार्यालयात ठाण मांडल्याचे वृत्त समाजमाध्यमांमधून पसरू लागले होते. याविषयी माहिती घेण्यासाठी घरत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांची व कोअर कमिटीची बैठक नियमितपणे प्रदेश कार्यालयात होत असते.
कोअर कमिटीच्या मीटिंगसाठी ५० पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये काहींनी नाईकांच्या पक्षप्रवेशाची चर्चा असल्याचा विषय आला होता. तेव्हा काही पदाधिकाºयांनी विरोध केला, परंतु विरोध करण्यासाठी आम्ही पदाधिकारी घेऊन गेलो होतो या वृत्तामध्ये तथ्य नाही. माझी भूमिकाही मी त्या ठिकाणी मांडली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.