नवी मुंबई : यावर्षीचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्या पाहता या सरकारने राज्य दिवाळखोरीत काढल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईत केला. राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचे काम शिंदे-भाजपने केले असून त्यांनी जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप करून हे सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले. नवी मुंबईतील ऐरोली येथे शनिवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या कोकण विभागीय जिल्हा आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ज्या सरकारमध्ये गरिबांना, शेतकऱ्यांना, तरुणांना न्याय मिळत नसेल तर हे सरकारच बरखास्त करण्याची आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा, स्थानिक संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेतला जात असून १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व सहा विभागांचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक काँग्रेस लढणार असून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे ते म्हणाले. राहुल गांधीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत असून भाजपाची रावणाची प्रवृत्ती जागी झाल्याने त्यांना सर्वत्र रावण दिसत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.
महागाई, बेरोजगारी, मोठ्या संख्येने होणाऱ्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, गरीबांना दवाखान्यात उपचार न मिळणे हे सर्व दहा डोक्यांचे रावणाचे गुण भाजपाचे असल्याचा हल्ला पटोले यांनी चढविला. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून भाजपाच्या या रावण बुद्धीला दहन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, कोकण विभागाचे समन्वयक प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पुनम पाटील, जिल्हा प्रवक्ता रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.
न्यायालयाचे ताशेरे तरीही मुश्रीफ सरकारमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले असतानाही ते सत्तेत आहेत कारण ते गुजरातच्या वॉशिंगमशिनमध्ये असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. जगातील सर्वात मोठा भ्रष्ट्राचार हा नोटबंदी असल्याचा आरोपदेखील यावेळी पटोले यांनी केला.
सत्तेत येण्यासाठी जाती धर्माचे बीज पेरले
भाजपने सत्तेत येण्यासाठी विविध जातीधर्माच्या लोकांना आरक्षण देण्याचा शब्द दिला. दोन वेळा केंदात आणि राज्यात सत्ता घेतली परंतु, आरक्षण मात्र न दिल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला.
नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा ठराव काँग्रेसने केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आणि विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. परंतु, विमानतळाच्या नावाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून विमानतळाला दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नसल्याचे पटोले यांनी सांगितले.