मेळावा रद्द करण्याची शिवसेनेवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 02:47 AM2019-04-03T02:47:20+5:302019-04-03T02:47:37+5:30

माथाडी भवनात आयोजन : परवानगी न घेतल्याने पोलिसांचा आक्षेप; शहरातील पदाधिकारी, कामगारांची उपस्थिती

Dismissal of Shiv Sena to cancel the rally | मेळावा रद्द करण्याची शिवसेनेवर नामुष्की

मेळावा रद्द करण्याची शिवसेनेवर नामुष्की

Next

नवी मुंबई : सातारा जिल्ह्यामधील शिवसेनेचे पदाधिकारी व कामगारांचा मेळावा मंगळवारी माथाडी भवनमध्ये आयोजित केला होता; परंतु परवानगी नसल्यामुळे मेळाव्याला निवडणूक विभाग व पोलिसांनी हरकत घेतली. यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर आली.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी सातारा जिल्ह्यामधील जे पदाधिकारी मुंबईमध्ये शिवसेनेत कार्यरत आहेत त्यांच्याबरोबर माथाडी भवनमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनाही बैठकीला बोलावण्यात आले होते. मात्र बैठकीसाठी आयोजकांनी पोलिसांची व निवडणूक विभागाची परवानगी घेतली नव्हती.

शिवसेनेच्या व माथाडींच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे बॅनर प्रसिद्ध केले. नरेंद्र पाटील व विजय चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, आरपीआय पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि माथाडी कामगारांची मीटिंग आयोजित केली आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी १0 वाजता हा मेळावा होणार असल्याचे सांगण्यात आले. मेळाव्यासाठी तीनशे ते चारशे पदाधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करण्यासाठी चौगुले व पाटील हेही उपस्थित होते; परंतु एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन परवानगी नसल्यामुळे मेळावा घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मेळावा नाही बैठक असल्याचे सांगण्याचा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला; परंतु तरीही परवानगी दिली नाही.
पोलिसांनी व निवडणूक विभागाने परवानगी नाकारल्यामुळे मेळाव्याला आलेल्यांची निराशा झाली. वास्तविक उत्साही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून बैठकीऐवजी मेळावा शब्द वापरल्यामुळे घोळ झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या भूमिकेचा आदर करून अखेर मेळावा रद्द करण्यात आला. आलेल्या पदाधिकाºयांच्या तालुकानिहाय माथाडी नेत्यांच्या दालनामध्ये बैठक घेऊन त्यांना प्रचाराविषयी मार्गदर्शन केले. दुपारपर्यंत या बैठका सुरूच होत्या. मुंबई व नवी मुंबईमधील सातारावासीयांशी संपर्क साधून जास्तीत जास्त पदाधिकाºयांनी प्रचारासाठी गावाकडे यावे, असे आवाहन करण्यात आले.

सातारा जिल्ह्यामधील नवी मुंबईमध्ये कार्यरत पदाधिकारी व कामगारांच्या बैठकांचे आयोजन केले होते. मेळावा नसून बैठक असल्यामुळे परवानगी घेण्यात आली नव्हती; परंतु काही पदाधिकाºयांनी सोशल मीडियावरून बैठकीऐवजी मेळावा असल्याचे संदेश पाठविले. यामुळे पोलिसांनी सभा घेण्यास मज्जाव केला. यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते

दिवसभर पोलिसांचा ठिय्या
माथाडी भवनमध्ये आयोजित मेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर नेत्यांनी दालनामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दिवसभर येथे पदाधिकाºयांची वर्दळ असल्यामुळे पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता. दिवसभर येथे थांबण्याच्या सूचना असल्याचेही पोलीस कर्मचाºयांनी यावेळी सांगितले.

Web Title: Dismissal of Shiv Sena to cancel the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.