काल रत्नागिरीत नाराजी, आज वाशीत कौतुक; विष्णुदास भावेतील सुविधांविषयी समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 10:34 AM2023-05-23T10:34:13+5:302023-05-23T10:34:35+5:30
रत्नागिरीतील प्रयोगाप्रसंगी अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यगृहांमध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळणार नसतील तर यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत रसिकप्रेक्षकांची माफीही मागितली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एकीकडे रत्नागिरीतील नाट्यगृहात एसीपासून साऊंड सिस्टीमपर्यंत कुठलीच सुविधा योग्यरित्या मिळत नसल्यामुळे अभिनेते भरत जाधव यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोयी-सुविधांबद्दल अनेक कलाकारांनी सोमवारी समाधान व्यक्त केले.
इतकेच नाही तर विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोयीसुविधा सर्वोत्तम असून, रत्नागिरीसह राज्यभरातील इतर नाट्यगृह चालकांनी तसेच नगरपालिका व पालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेचा आदर्श ठेवावा, असे आवाहनही केले आहे. दरम्यान, नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत अभिनेते प्रशांत दामले यांनीही नुकतीच कल्याणमध्ये नाराजी व्यक्त केली होती.
रत्नागिरीतील प्रयोगाप्रसंगी अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यगृहांमध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळणार नसतील तर यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत रसिकप्रेक्षकांची माफीही मागितली होती. त्यानंतर राज्यातील नाट्यगृहांमधील गैरसोयींचा प्रश्न ऐरणीवर आला. नाट्यगृहांच्या दुरवस्थेविषयी कलाकारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असताना, नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाचे मात्र कलाकारांकडून कौतुक होत आहे.
मेकअपरूममधून स्टेजवरचे दिसते
अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने विष्णुदास भावे नाट्यगृहाविषयीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला आहे. अनेक शहरांमधील नाट्यगृहांची दुरवस्था झाली आहे. अशा स्थितीत विष्णुदास भावे नाट्यगृहाचे वेगळेपण व्हिडीओमधून सांगितले आहे. वातानुकूलित यंत्रणा अद्ययावत आहे. मेकअप रूममध्ये स्क्रिन बसविला आहे. यामुळे स्टेजवर काय चालले आहे, हे कलाकारांना आतमध्ये बसून पाहता येते असे कलाकारांनी सांगितले आहे.
यांनी व्यक्त केले समाधान
अभिनेत्री मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम यांच्यासह अनेक कलाकारांनी नाट्यगृहामधील सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेने ज्याप्रमाणे नाट्यगृहाचे व्यवस्थापन सांभाळले आहे, येथे अत्याधुनिक सुविधा पुरविल्या आहेत, त्याचे अनुकरण राज्यभर होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. वातानुकूलित यंत्रणा व इतर सुविधाही दर्जेदार आहेत. राज्यातील इतर नाट्यगृह व्यवस्थापनांनी याचे अनुकरण केले पाहिजे.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री
राज्यातील इतर नाट्यगृह व नवी मुंबईमधील विष्णुदास भावे नाट्यगृह यामध्ये खूप फरक आहे. नवी मुंबई महापालिकेने सर्वोत्तम सुविधा पुरविल्या असल्यामुळे येथे प्रयोग करताना वेगळा आनंद मिळत असतो.
- रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री