अरुणकुमार मेहत्रे/ लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : सिडको वसाहतीतील कचरा उचलण्याचे काम शनिवारपासून बंद करून, सिडकोने महापालिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेकडे मनुष्यबळ, तसेच व्यवस्था नसल्याने ऐन पावसाळ्यात रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या प्रश्नी त्वरित तोडगा काढण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.पनवेल महानगरपालिकेत नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे या सिडको वसाहती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महापालिका स्थापन झाली असली तरी मनुष्यबळ तसेच निधीची कमतरता आदी समस्या भेडसावत आहेत. निवडणूक झाली असली तरी अद्याप महापौर, उपमहापौरांची निवड झालेली नाही. त्यामुळे पहिली आमसभासुद्धा झालेली नाही. यामुळे महापालिकेचे पायाभूत सुविधांबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असताना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांना अचानक पत्र पाठवून १ जुलैपासून घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, असे सूचित केले. त्याचबरोबर संबंधित ठेकेदारांनाही साफसफाई, तसेच कचरा उचलणे बंद करण्याच्या सूचना दिल्या. या पत्राला आयुक्तांनी काही तासांत उत्तर दिले. पनवेल महापालिकाही नव्याने स्थापन झाली असून, अद्याप विषय समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही. महापौर, उपमहापौरांची निवडही अद्याप झाली नसल्याने महापालिकेकडे सध्या घनकचरा व्यवस्थापनाकरिता पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे निश्चित धोरण ठरेपर्यंत हे काम सिडकोनेच करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे; परंतु ३० जून रोजी सायंकाळी सिडकोच्या अधिकाऱ्यांचा चमू महापालिकेत एमडींचे पत्र घेऊन आल्याचे समजते. त्यांनी कचरा उचलण्यास असमर्थता दर्शवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यानुसार शनिवारी सिडकोकडून वसाहतीतील कचरा उचलण्यात आला नाही. याबाबत सिडको आणि महापालिकेने समन्वय साधून त्वरित हा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे. नियोजन प्राधिकरण म्हणून ही जबाबदारी सिडकोची आहे. त्यामुळे महापालिकेकडे यंत्रणा निर्माण होईपर्यंत सिडकोनेच घनकचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रि या माजी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापन वर्ग करून घेण्याबाबत सिडकोचे आम्हाला पत्र आले आहे, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेची जनरल बॉडी अद्याप बसलेली नाही. त्यामुळे सध्या याबाबत धोरणात्मक निर्णय झालेला नाही. बॉडी स्थापन झाल्यानंतर याबाबत विचार करण्यात येईल, असे आम्ही सिडकोला कळविले आहे.- सुधाकर शिंदे, आयुक्त, महापालिका, पनवेल.वरिष्ठांच्या आदेशानुसार १ जुलैपासून सिडकोच्या आरोग्य विभागाने घनकचरा व्यवस्थापनाचे काम थांबविले आहे. वसाहती महापालिकेत वर्ग झाल्यामुळे ही जबाबदारी मनपाने उचलणे क्र मप्राप्त आहे. हे काम हस्तांतरित करणे हा वरिष्ठ पातळीचा विषय आहे.- डॉ. बी. एस. बाविस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको.साडेतीनशे टन कचरासिडको वसाहतीत दररोज जवळपास साडेतीनशे टन कचऱ्याची निर्मिती होते. हा कचरा तळोजा येथील क्षेपणभूमीवर टाकण्यात येत होता; परंतु गेल्या काही महिन्यांपासून येथे कचरा डम्प करून दिला जात नाही. त्यामुळे वहाळ येथे सिडकोच्या भूखंडावर कचरा टाकण्यात येत आहे. पनवेल महापालिकेडे मनुष्यबळ नसल्याने घनकचरा व्यवस्थापन कठीण आहे.
कचराप्रश्नी सिडकोकडून महापालिकेची कोंडी
By admin | Published: July 03, 2017 6:48 AM