कचऱ्याची गैरपद्धतीने विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:24 AM2018-05-03T04:24:15+5:302018-05-03T04:24:15+5:30
प्लास्टिकच्या वापरावर आलेल्या बंदीनंतरही वेगवेगळ्या समारंभांमध्ये त्याचा वापर होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र, चोरीछुपे वापरले जाणारे प्लास्टिक उघड्यावर जाळले जात
नवी मुंबई : प्लास्टिकच्या वापरावर आलेल्या बंदीनंतरही वेगवेगळ्या समारंभांमध्ये त्याचा वापर होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र, चोरीछुपे वापरले जाणारे प्लास्टिक उघड्यावर जाळले जात असल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहाच्या समोरील मैदानावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने शासनाने राज्यात प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या उत्पादनांमध्ये पिशव्या, ग्लास, थर्माकोल आदीचा समावेश आहे. त्यानुसार अशी उत्पादने विकणाºया अथवा ग्राहकांना पुरवणाºया व्यावसायिकांवर पालिकेने कारवाया देखील केल्या आहेत. मात्र, विविध समारंभांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ग्लास तसेच थर्माकोलच्या प्लेट वापरल्या जात असल्याचे दिसून येत आहे. मंगल कार्यालये, हॉल व्यवस्थापन तसेच कॅटरिंग व्यावसायिक यांच्याकडून चार भिंतीच्या आत या प्लास्टिकच्या साहित्यांचा वापर होत आहे. त्यामुळे मात्र पालिका अधिकाºयांचे अद्याप लक्ष गेले नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. याच संधीचा फायदा घेऊन मोठमोठ्या समारंभांमध्ये वापरला जाणारा प्लास्टिकचा कचरा जाळून नष्ट केला जात असल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. प्लास्टिकच्या वापरापेक्षा तो जाळणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक घातक आहे. त्यानंतरही उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.
कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथील भूखंड क्रमांक १ वर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठवलेला कचरा जाळला जात आहे. त्यामध्ये प्लास्टिकचे ग्लास व प्लेटचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शेतकरी समाज मंदिर सभागृहासमोरच असलेल्या मोकळ्या भूखंडावर हा प्रकार होत आहे. यामुळे त्याच ठिकाणी होणाºया समारंभांमधला हा प्लास्टिकचा कचरा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर एक ते दोन दिवसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्याची परिसरातील रहिवाशांची तक्रार आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व दुर्गंधी पसरत असल्याचीही त्यांची तक्रार आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीचा निर्णय खासगी हॉल, मंगल कार्यालये यांना वगळून आहे का? असा प्रश्नही रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.