कळंबोली : खांदा वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकण्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी पनवेल शहरातील गांधी हॉस्पिटलसमोरील कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. कचराकुंडीतील या बायोमेडिकल कचºयाची घंटागाडीतून विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रहिवाशांनी जोरदार आक्षेप घेतला असून, संबंधित रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी दवाखाने आहेत. यातील अनेक रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला देणे बंधनकारक आहे, त्यासाठी शुल्क भरावे लागते. हे शुल्क वाचविण्यासाठी अनेक रुग्णालये निर्माण होणाºया वैद्यकीय कचºयाची सार्वजनिक कुंडीत विल्हेवाट लावत असल्याचे दिसून आले आहे.महापालिकेची घंटागाडी दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी बुधवारी येथील गांधी हॉस्पिटलजवळ गेली असता बाहेरील कचराकुंडीत रिकाम्या सलाइन्सच्या बाटल्या, टॅबलेटचे पॉकिट, इंजेक्शनच्या सुई आदीचा साठा आढळून आला. या कचराकुंडीत अशाप्रकारचा कचरा नेहमीच असतो. त्यामुळे तो उचलताना हातापायाला इजा होते, असे घंटागाडी कामगारांनी सांगितले. वैद्यकीय कचºयाची अशाप्रकारे विल्हेवाट लावणाºया रुग्णालयावर महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.दरम्यान, या संदर्भात महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तर संबंधित रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते व्यस्त असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.बायोमेडिकल वेस्ट वेगळे ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे; परंतु घंटागाडीत हा घातक कचरा टाकला जात असल्याने सफाई कामगारांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा प्रकार तातडीने थांबविला गेला नाही, तर नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करावे लागेल.- प्रथमेश चंद्रशेखर सोमण,सल्लागार संस्थापक,शिवप्रेरणा श्रमिक कामगार सेना
पनवेलमध्ये वैद्यकीय कचऱ्याची घंटागाडीतून होते विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:28 PM