नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोग, कार्यक्रमासाठी असणारे दर २00३ सालापासून वाढविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दरामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने शुक्र वार, १९ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दरवाढीचा प्रस्ताव मांडला होता. शहरात एकमेव नाट्यगृह असून दरवाढीचा फटका नागरिकांना बसणार असल्याने लोकप्रतिनिधींनी या दरवाढीला विरोध केला. यावर महापौर जयवंत सुतार यांनी इतर महापालिकांच्या नाट्यगृहांच्या दरांचा आढावा घेऊन या प्रस्तावावर फेरविचार करून प्रस्ताव आणण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
वाशी येथील भावे नाट्यगृह ११ जुलै १९९७ रोजी सिडकोकडून महापालिकेला सामंजस्य करार करून हस्तांतरित झाले. सदर नाट्यगृहात नाटक, मराठी वाद्यवृंद, भक्ती संगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, एकपात्री प्रयोग, लावणी नृत्य, लोकनाटक, सांस्कृतिक कार्यक्र म, शैक्षणिक संस्था, जादूचे प्रयोग, इतर भाषिक नाटके, सेमिनार, बिझनेस मीटिंग, लेक्चर आदी कार्यक्र मांसाठी वापरले जाते. नाट्यगृह वापराचे दर गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेले नसल्याने दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. यावर चर्चा करताना नगरसेविका सरोज पाटील यांनी शहरातील कलाकारांना वाव देण्यासाठी लागू केलेल्या दरांमध्ये ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. नगरसेवक मनोहर मढवी यांनी नाट्यप्रयोग किंवा कार्यक्रमासाठी वेळेची मर्यादा वाढल्यास त्यासाठी लागणाºया अतिरिक्त शुल्काबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नाट्यगृह वापरासाठी देण्यात आलेले दर हे एखाद्या टेंडरप्रमाणे असल्याचे सांगत नवी मुंबई आणि इतर शहरातील नाट्य परिषद संस्थांशी विचारविनिमय करून दर निश्चि करावेत आणि सदर प्रस्ताव पुन्हा सादर करावा, अशी मागणी केली. नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी शहरात भावे हे एकमेव नाट्यगृह असून नेहमीच बुकिंग फुल्ल असते. नाट्यगृह हे महापालिकेच्या उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे दरवाढ करणे योग्य नसल्याचे सांगत दरवाढीमुळे प्रयोगाच्या तिकिटाचा दर देखील वाढणार आहेत. त्यामुळे सदर दरवाढ रद्द करून प्रस्ताव पुन्हा सदर करावा, अशी मागणी केली. नाट्यगृहाच्या दराची तुलना करून प्रस्ताव पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश महापौर जयवंत सुतार यांनी प्रशासनाला दिले.