सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : माथाडी कामगारांसाठी घणसोलीत उभारली जात असलेली इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सदर भूखंड माथाडी कामगारांसाठी सवलतीच्या दरात मिळवल्यानंतर, त्याचा मोठा भाग खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न युनियन करत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. त्याचा जाब विचारल्याने युनियनने कामगारांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माथाडी कामगारांच्या घरांचा वाद चव्हाट्यावर आला असून मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.घणसोली सेक्टर ९ येथील २० क्रमांकाच्या सुमारे तीन एकरच्या भूखंडावर माथाडी कामगारांसाठी दोन इमारती उभारण्यात आल्या आहेत. सदर भूखंड अखिल महाराष्टÑ माथाडी कामगार युनियनने सुमारे दहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून हा भूखंड सिडकोकडून अत्यल्प दराने मिळवला आहे. यानुसार त्यावर सुरवातीला सात मजली चार इमारती उभारल्या जाणार होत्या. परंतु कालांतराने बदलत गेलेल्या निर्णयानंतर सद्यस्थितीला त्याठिकाणी सतरा मजली दोन इमारती उभ्या आहेत. त्यामध्ये एफएसआयपासून ते सर्वच बाबतीत मोठा घोटाळा असल्याचा कामगारांचा आरोप आहे. तसेच कामगारांच्या नावे मिळवलेल्या एकूण भूखंडापैकी मोक्याचा भाग वेगळा करून तो खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा युनियनचा प्रयत्न असल्याचाही कामगारांचा आरोप आहे. त्यावरून युनियन आणि कामगार यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. अशातच इमारत बांधून पूर्ण असतानाही मागील चार वर्षांपासून घरांचा ताबा मिळत नसल्यानेही कामगार संतप्त झाले आहेत. अनेक कामगारांच्या पगारातून गृहकर्जाचे हप्ते जावू लागले आहेत. यामुळे लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा यासाठी कामगारांनी युनियनकडे तगादा लावला आहे.मात्र कामगारांकडून वारंवार केल्या जाणाºया चौकशांना कंटाळून युनियनने काही प्रमुख कामगारांविरोधात पोलिसांकडेच तक्रार केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे १००/१५० कामगारांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी युनियन प्रमुख व कामगार समोरासमोर आल्याने वाद उद्भवून तणाव निर्माण झाला होता. अखेर संतप्त कामगारांनी देखील युनियनच्या पदाधिकाºयांविरोधात फसवणुकीची व दमदाटी केल्याची तक्रार केली आहे. वर्षभरापूर्वीच एका युनियनमार्फत घरे देण्याचे आमिष दाखवून, माथाडी तसेच बिगर माथाडींकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार घडलेला असतानाच, हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांच्या नावे घरे लाटली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.घणसोली सेक्टर ९ येथील माथाडी कामगारांसाठी मिळालेला २० क्रमांकाचा भूखंड मुख्य रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी आहे. याच भूखंडालगतच्या इतर भूखंडाचे प्रति शंभर मीटरचे दर कोटीच्या घरात आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांच्या या सुमारे तीन एकराच्या भूखंडापैकी शिल्लक असलेल्या जागेकडे अनेक खासगी विकासक डोळा लावून आहेत. त्याकरिताच भूखंडाच्या समोरच्या भागाऐवजी मागच्या भागात गृहप्रकल्प उभारण्यात आल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.कामगारांना लवकरात लवकर घरांचा ताबा देण्याचा युनियनचा प्रयत्न आहे. परंतु गृहप्रकल्प उभारताना अनेक कारणांनी झालेल्या विलंबामुळे बांधकाम खर्च अपेक्षेपेक्षा जास्त झाला आहे. त्याचा भार कामगारांवर नको याकरिता इमारतीखाली अथवा उर्वरित जागेत व्यावसायिक गाळे उभारणीचा प्रस्ताव सिडकोकडे मांडला असता सिडकोने तो नाकारला आहे. त्याव्यतिरिक्त माथाडी कामगारांच्या घराची जागा खासगी विकासकाला देण्यासंबंधी कसल्याही हालचाली झालेल्या नाहीत.- पोपट पाटील, संस्थापक,अखिल महाराष्टÑ माथाडी कामगार युनियनमाथाडी कामगारांना सदर इमारतीमध्ये सुमारे सात लाख रुपये मोजून घरे मिळणार आहेत. मात्र प्रत्यक्षात घराची पाहणी केल्यानंतर हे घर की खुराडे असा प्रश्न कामगारांच्या कुटुंबीयांना पडला आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सिडकोने माथाडी कामगारांना पावणेदोन लाखात सिम्प्लेक्स वसाहतीत घरे दिली होती. त्यापेक्षाही या घरांचा आकार कमी व किंमत जास्त आहे. तर अग्निशमन यंत्रणाही उशिराने व उघड्यावर बसवल्याने अडचणीची ठरत आहे. शिवाय अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजावेळीच सिमेंट कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे येथे रहायचे कसे असा प्रश्न कामगारांना पडला आहे. परंतु युनियनने घरे सुटसुटीत बांधण्याऐवजी जागा वाचवून विकासकाच्या घशात घालण्याला प्राधान्य दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आहे.
माथाडींच्या घरांचा वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:20 AM