नवी मुंबई विमानतळ: मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम, बैठक निष्फळ; वाद चिघळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:48 PM2021-06-20T19:48:06+5:302021-06-20T19:49:08+5:30
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण वादाच्या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्याने नामकरणाचा वाद चिघळणार आहे.
वैभव गायकर, पनवेल
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत लोकनेते दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातुन येत्या २४ तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी दि.२० रोजी कृती समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्याने नामकरणाचा वाद चिघळणार आहे.
यापुर्वी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली होती.यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी विमानतळा ऐवजी इतर प्रकल्पला दिबांचे नाव सुचविण्याची सुचना केली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्त नेत्यांमध्ये फूट पडल्याचे दिसुन आली. महाविकास आघाडीचे स्थानिक नेत्यांनी विमानतळाऐवजी इतर प्रकल्पाला दिबांचे नाव देण्याबाबत तयारी दर्शविली होती. तर भाजपसह इतर प्रकल्पग्रस्त नेते दिबांच्या नावावर ठाम होते.याबाबत विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांचा अवधी देऊन पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते हि बैठक रविवार दि,२० रोजी वर्षा निवासस्थानी पार पडली.या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत ठाम भुमिका घेतली. इतर प्रकल्पाला दिबांचे नाव सुचविण्याचे पुनरूच्चार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यावर कृती समितीच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त करीत नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळा ऐवजी दुसरे कोणतेच पर्याय मान्य नसल्याची भूमिका घेतली. या बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, संतोष केणे,राजेश गायकर आदींसह प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.
यावेळी कृती समितीने दिबांच्या नावाला पाठिंबा दर्शविणारे स्थानिक ग्रामपंचायती तसेच विविध प्राधिकरणाचे ठराव मुख्यमंत्र्याना सादर केले.या ठरावांची देखील दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही.विशेष म्हणजे तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतल्यास शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरतील अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याने अशाप्रकारची भोषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकुर यांनी केला.
या बैठकीत मुख्यमंत्री बैठक अर्धवट सोडून गेल्याचा आरोप देखील कृती समितीने केला आहे.दरम्यान येत्या 24 तारखेच्या मोर्चावर कृती समिती ठाम आहे.पोलीस प्रशासनाने कृती समितीच्या सदस्यांसह आंदोलनात सक्रिय सहभाग घेणाऱ्या शेकडो जणांना नोटिसा बजवल्या आहेत.
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांची मागणी पूर्णपणे नाकारली.स्थानिक ग्रामपंचायतींनी केलेले ठरावांना देखील मुख्यमंत्री नाकारत आहेत.विशेष म्हणजे आंदोलकांना शांत करण्याऐवजी भडकविन्याचे काम मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत केले .अशा प्रकारचे मुख्यमंत्री राज्याला लाभले हि दुर्दैवाची बाब आहे.
- प्रशांत ठाकुर (आमदार ,पनवेल )