हॉटेलवरील कारवाईकडे दुर्लक्ष; रिकाम्या जागेत शेड बांधून वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:01 AM2019-12-10T01:01:54+5:302019-12-10T01:02:09+5:30
अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी संशय
- सुर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : हॉटेल व्यावसायिकांकडून होणाºया अतिक्रमणांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत संशय व्यक्त होत आहे. हॉटेल समोरील जागेसह इतर मोकळ्या जागेत अतिक्रमण करुन त्याचा व्यवसायिक वापर केला जात आहे.
शहरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी पालिकेची अभय योजना अस्तित्वात असल्याचा संशय सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मागील काही वर्षात शहरातील वेगवेगळ्या प्रकारच्या अतिक्रमणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यावरुन सर्वसामान्यांचा प्रशासनाविषयी रोष वाढत चालला आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पालिकेची विभाग निहाय अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु आहे. मात्र या कारवार्इंमध्ये हॉटेल्स व्यावसायिकांना वगळले जात असल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीला शहरात हॉटेल व्यवसाय तेजीत असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता मार्जिनल स्पेसचा वापर करण्यासह हॉटल लगतच्या मोकळ्या जागाही बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याठिकाणी ग्राहकांच्या बैठकीची सोय करुन संबंधीत जागेचा व्यवसायिक वापर करण्यावर जोर दिला जात आहे. याकरिता सरसकट सर्वच हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. तर काहींनी मोक्याच्या जागा शोधूनच हॉटेल सुरु केले आहेत. त्यांच्याकडून पदपथ अथवा सोसायटीच्या आवारातील मोकळी जागा देखिल बंदिस्त करुन घेतली जात आहे. सध्या शहरातील प्रत्येक नोडमध्ये छोट्या मोठ्या हॉटेल्सच्या आवारात हे चित्र पहायला मिळत आहे.
काही हॉटेल व्यवसायिकांनी टेरेसच्या जागेत शेड उभारुन त्याठिकाणी मद्यपींसाठी विशेष सोय करुन दिल्या आहेत. तर काहींनी हॉटेल व बारच्या बाहेरच्या जागेतच टेबल मांडून उघड्यावर ग्राहकांची सोय करुन दिली आहे. याठिकाणी रात्री उशीरापर्यंत खानावळ अथवा तळीरामांच्या पार्ट्या रंगत आहेत. अशा ठराविक हॉटेल व बारवर यापूर्वी कारवाईचा दिखावा पालिकेकडून झालेला आहे. मात्र दुसरयाच दिवशी तिथली परिस्थीती जैसे थे पहायला मिळत आहे.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात बहुतांश हॉटेल्सचे अतिक्रमण पाडण्यात आले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र पक्के बांधकाम करण्याऐवजी बांबूचे शेड उभारण्यात आले आहेत. वाशी, कोपर खैरणे, घणसोली, नेरुळ, सीबीडी यासह ऐरोली परिसरात असे प्रकार दिसून येत आहेत. तर काही रहिवाशी अथवा वाणिज्य इमारतींचे दोन पैकी एक प्रवेशद्वार देखील हॉटेल व्यवसायिकांनी बळकावले आहेत. त्याकरिता सोसायटी कमिटीला महिना ठराविक रसद पुरवली जात असल्याच्याही चर्चा आहेत.