ऑडिटोरियममधील १५० हून अधिक खुर्च्यांची दुरवस्था; आगरी- कोळी भवनातील प्रकार
By योगेश पिंगळे | Published: February 5, 2024 05:32 PM2024-02-05T17:32:10+5:302024-02-05T17:33:05+5:30
नेरुळमधील आगरी- कोळी भवनातील प्रकार.
योगेश पिंगळे,नवी मुंबई : शहरातील मूळ निवासी आगरी-कोळी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने सिडकोने नेरुळ सेक्टर २४ येथे आगरी-कोळी सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली आहे; परंतु देखभाल दुरुस्तीकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना विविध गैरसोईंना सामोरे जावे लागत आहे. ऑडिटोरियममधील सुमारे १५० हून अधिक खुर्च्या तुटलेल्या असून याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आगरी-कोळी समाजाच्या मूळ संस्कृतीची शहरवासीयांना ओळख राहावी तसेच समाजातील नागरिकांना विविध कार्यासाठी सभागृह उपलब्ध होण्यासाठी सिडकोने या वास्तूची निर्मिती केली आहे. या वास्तूमध्ये आगरी कोळी समाजासह इतर समाजाचेदेखील विविध कार्यक्रम साजरे होतात. भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर ५०० आसन क्षमता असलेले ऑडिटोरियम, तर दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर विविध कार्यासाठी सभागृह बनविण्यात आले आहे. या भवनाने कोरोना काळात कोविड सेंटरची महत्त्वाची भूमिकादेखील पार पाडली आहे. या काळात पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. लग्नासारख्या विविध कार्यासाठी या सभागृहांना मागणी जास्त असल्याने कोरोना काळानंतर सिडकोच्या माध्यमातून या सभागृहांची दुरुस्ती करण्यात आली; परंतु दुरुस्तीच्या कामापासून ऑडिटोरियम मात्र दुर्लक्षित राहिले आहे. ५०० आसन क्षमता असलेल्या ऑडिटोरियममधील तब्बल १५० हून अधिक खुर्च्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. दुरवस्था झालेल्या खुर्च्या नागरिकांनी वापरू नयेत यासाठी त्यावर खुणा करण्यात आल्या असून प्रथम रांगेतील नादुरुस्त खुर्च्यांपुढे दुसऱ्या खुर्च्या उभ्या केल्या आहेत.
कमी खर्चात सभागृह उपलब्ध होत असल्याने आगरी -कोळी भवनमधील सभागृह आणि ऑडिटोरियमला मागणी असते; परंतु ऑडिटोरियममधील खुर्च्यांची दुरवस्था झाल्याने ऑडिटोरियमची मागणी घटली असून प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.