सायबर सिटीतील उद्यानांची दुरवस्था, लहान मुलांसह आबालवृद्धांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:11 AM2018-08-08T03:11:51+5:302018-08-08T03:11:53+5:30

स्वच्छ आणि हरित नवी मुंबईच्या संकल्पनेवर कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या महापालिकेला शहरातील उद्यानांचा विसर पडला आहे.

Disruption of cyber city gardens, disadvantages of infants with small children | सायबर सिटीतील उद्यानांची दुरवस्था, लहान मुलांसह आबालवृद्धांची गैरसोय

सायबर सिटीतील उद्यानांची दुरवस्था, लहान मुलांसह आबालवृद्धांची गैरसोय

Next

- अनंत पाटील
नवी मुंबई : स्वच्छ आणि हरित नवी मुंबईच्या संकल्पनेवर कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या महापालिकेला शहरातील उद्यानांचा विसर पडला आहे. अनेक उद्यानांची दयनीय अवस्था झाली. तुटलेली खेळणी, उखडलेली आसन व्यवस्था, गंजलेले प्रवेशद्वार, उद्यानात वाढलेले रानटी गवत हे दृश्य बहुतांशी उद्यानात पाहायला मिळते. या प्रकाराकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याने लहान मुलांसह आबालवृद्धांची मोठी गैरसोय होत आहे.
महापालिकेने नवी मुंबईत २४५ उद्याने विकसित केली आहेत, यातील काही उद्यानांत अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, तर काही उद्यानांत लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी बसविण्यात आली आहेत. मध्यंतरीच्या काळात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत उद्यानांच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला; परंतु सर्वेक्षण संपताच ही उद्याने दुर्लक्षित झाली आहेत. वाशी सेक्टर १० (अ) येथील स्व. मीनाताई ठाकरे उद्यानात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून प्राण्यांची शिल्प उभारली आहेत. लहान मुलांना विविध प्राण्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने ही शिल्पे साकारण्यात आली आहेत. तसेच लहान मुलांसाठी टॉय ट्रेनही सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात या शिल्पांची औपचारिक देखभाल करण्यात आली; परंतु त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाला या शिल्पांचा विसर पडला. याचा परिणाम म्हणून आजमितीस यातील बहुतांशी शिल्पाला तडे गेले आहेत, तर काही शिल्पावर शेवाळ चढल्याने रंग उडाला आहे. याच उद्यानात लहान मुलांच्या करमणुकीसाठी टॉय ट्रेन (झुक झुक आगगाडी ) सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात ही ट्रेन बंद असते, त्यामुळे उद्यानातील कंत्राटी कामगारांनी या ट्रेनचा वापर दुपारच्या जेवणावळी आणि विश्रांतीसाठी सुरू केल्याचे पाहावयास मिळते.
नेरुळ, बेलापूर आणि कोपरखैरणे परिसरातील काही अपवाद वगळता अनेक उद्यानांची अवस्था बिकट झाल्याचे दिसून आले आहे. ऐरोलीत सेक्टर १८ येथील स्व. रामदास बापू पाटील या उद्यानाचीही बिकट अवस्था झाली आहे. उद्यानातील खेळणी तुटली आहेत. लाकडी आसने मोडकळीस आली आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या उद्यानाचे लोखंडी प्रवेशद्वार गंजलेल्या अवस्थेत असून, ते पूर्णत: मोडकळीस आले आहे, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या उद्यानाच्या संरक्षण भिंतीचा दक्षिणेकडील भाग कोसळला आहे. प्रवेशद्वार आहे; पण तेही पूर्णत: गंजले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवेशद्वाराला कुलूपही लावता येत नाही. उद्यानातील दिवाबत्ती गायब झाली आहे, याचा फायदा मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. या उद्यानात समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
>महापालिका कार्यक्षेत्रातील उद्यानांची पाहणी करण्यात आली आहे. कोणत्या उद्यानात दुरुस्ती व डागडुजीची आवश्यकता आहे, याचा तपशील गोळा करून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. स्थापत्य विभागाकडून तशा आशयाचे पत्रही प्रशासनाला देण्यात आले आहे. वाशीतील मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेनजवळील प्रकाराबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील. पावसाळ्यानंतर ही टॉय ट्रेन लहान मुलांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल.
- नितीन काळे,
उपायुक्त, उद्यान विभाग,
महापालिका

Web Title: Disruption of cyber city gardens, disadvantages of infants with small children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.