सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप दिला जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील शंभरहून अधिक मंडळांनी आपला हा निर्णय प्रशासनाला कळवला आहे. यामुळे विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे.विसर्जनासाठी होणारा खर्च, गर्दी टाळण्यासाठी स्थापनेच्या ठिकाणीच गणरायाला निरोप देण्यासाठी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपासून मंडपातच कृत्रिम तलाव बनवले जाणार आहेत. बहुतांश मंडळांनी पीओपीऐवजी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य दिले आहे. आजवर या मंडळांकडून ७ ते १० फुटांच्या मूर्तीची स्थापना केली जात होती. मात्र यंदा सामाजिक जबाबदारीची जाणीव या मंडळांकडून राखण्यात आली आहे.यंदा बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसाला तसेच गौरीसोबत होणार आहे. त्यामुळे या सर्व विसर्जनस्थळांवर गर्दी होणार आहे. त्यामुळे ते पाहता शंभरहून अधिक मंडळांनी विसर्जन मार्गावरील गर्दी, यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देण्याचा घेतलेला निर्णय इतर मंडळांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.>यावर्षी कोणताही देखावा न उभारता केवळ दोन फूट श्रीच्या शाडूच्या मूतीर्ची स्थापना करून उत्सव साजरा करत आहोत. तर विसर्जन मिरवणूक, भाविकांची गर्दी तसेच विसर्जन स्थळावरील ताण टाळण्यासाठी मंडळाच्या ठिकाणीच मूर्तीचे कृत्रिम तळ्यात विसर्जन केले जाणार आहे. - ललित सकट.अध्यक्ष - सार्वजनिक उत्कर्ष मित्र मंडळ, कोपर खैरणे
विघ्नहर्त्याला स्थापनेच्या जागीच निरोप देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:57 PM