नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील रसायनमिश्रीत पाणी नाल्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे तुर्भेसह कोपरी परिसरामधील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. रहिवाशांनी पालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असून, कडक कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदार रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता नाल्यांमध्ये सोडून देत आहेत. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधून हे पाणी खाडीमध्ये मिसळत आहे. नाल्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या वसाहतीमध्ये तीव्र दुर्गंधी पसरत आहे. कारखान्यांमधून हवेत धूर सोडला जात असून, त्यामुळेही कोपरी, वाशी सेक्टर २६, तुर्भे गाव, तुर्भे सेक्टर २१, २२ व इतर परिसरातील प्रदूषण वाढत आहे. कोपरी परिसरामध्ये एक वर्षापासून प्रदूषण सातत्याने वाढत आहे. सप्टेंबरपासून खूपच वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. चक्कर येणे, मळमळणे व इतर अजार होऊ लागले आहेत. लोकप्रतिनिधीनी वारंवार याविषयी महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या जात असूनही त्याची योग्य पद्धतीने दखल घेतली जात नाही. नुकतीच आमदार गणेश नाईक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देण्यात आले आहे.एमआयडीसीतील कारखानदारांनी दूषित पाणी सीईटीपी केंद्रात पाठवून तेथे त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी नाल्यात सोडून देणे अपेक्षित आहे, परंतु प्रक्रिया न करताच रसायनमिश्रीत पाणी नाल्यात सोडले जात आहे. याविषयी रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. लोकप्रतिनिधीही वारंवार आवाज उठवत आहेत, परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे लवकरच प्रदूषण थांबविण्यासाठी येथील नागरिक तीव्र लढा उभा करणार आहेत.
कोपरी परिसरात एक वर्षापासून प्रदूषण वाढत आहे. आम्ही वारंवार याविषयी तक्रारी केल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. लवकरच जनआंदोलन उभे केले जाईल.- परशुराम भोईर, माजी नगरसेवक, कोपरी
तुर्भे परिसरातही प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक आजारी पडू लागले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याविषयी निवेदन दिले असून, कारवाई झाली नाही, तर जनहितासाठी आंदोलन केले जाईल.- शुभांगी पाटील, माजी स्थायी समिती सभापती
एमआयडीसीला लागून असलेल्या परिसरामध्ये प्रदूषण वाढत आहे. सकाळी व सायंकाळी दुर्गंधी वाढत आहे. नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. तत्काळ प्रदूषण थांबविले नाही व संबंधितांवर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल.- रामचंद्र घरत, जिल्हा अध्यक्ष भाजप